मराठी कविता
तो, मी आणि पाऊस

तो, मी आणि पाऊस

तो, मी आणि पाऊस
आमचं छानच त्रिकूट जमलं होतं
माझ्या शिवाय त्याला
त्याच्या शिवाय मला अन्
आमच्या शिवाय पावसाला
काही केल्या करमत नव्हतं

आम्ही रोज भेटायचंच
असं काही ठरलं नव्हतं
पण आम्ही भेटायचं म्हटल्यावर
पावसाचं येणं तेवढं नक्की होतं
आमच्या शिवाय पावसाला
काही केल्या करमत नव्हतं

तो आला की तासंतास
गप्पांमध्ये रमायचो आम्ही
येताना तसे कोरडेच
मात्र कसं कुणास ठाऊक
नंतर मात्र भिजायचो आम्ही
आता हे भिजवणंही
पावसाचंच एक कारस्थान होतं
कारण
आमच्या शिवाय पावसाला
काही केल्या करमत नव्हतं

एकदा म्हटलं न सांगताच भेटावं
कधी नव्हे ते फक्त दोघांनीच
एकमेकांत रमावं
चुकवून नजर पावसाची
शेवटी ठिकाण गाठलं
काही बोलणार तितक्यात
वरती आभाळ दाटलं
आसमंतात दिसले
बदलेले रंग
वाहणारे वारे आपल्याच
तालात दंग
नजरानजरा व्हावी एवढंच
एकटेपणं हातात होतं
पुढल्या काही क्षणातच
सारं सारं चिंब होतं
मन झालं खट्टू पण
रुसण्याचं तसं कारण नव्हतंच
काय करणारं
माझ्या शिवाय त्याला
त्याच्या शिवाय मला अन्
आमच्या शिवाय पावसाला
काही केल्या करमत नव्हतं!

error: Content is protected !!