वसंत
कुठे तांबडे कुठे जांभळे रंग उधळती पाने
कुठे कोरड्या फांदीवरचे झुरणे अन् ते गाणे
कुणी वेचली कुणी टाकली कुणी सोडली मागे
कुणी ठेवली पुस्तकात ती सुरेल जसे तराणे
जरी कोरडे झाले सारे जरी वाळली झाडे
कुठे अचानक हवीहवीशी हिरवी दिसती खोडे
तिथेच रमते पुन्हा पुन्हा का मन हे जाऊन अडते
तिथेच सुटते जुने पुराणे अडलेले ते कोडे
कुठेच नाही दिसले बघ ना फुल उमलले नाही
गंध तरीही श्वासांमधुनी कसा जुना तो वाही
कुठेच नाही वसंतातल्या भेटी मधली सलगी
तरी हासते वेलीवरती डोलत बसते काही
गारव्यातला स्पर्श हवासा पानांमधला ओला
उगाच वेडा काटा माझ्या अंगावरती आला
पुन्हा दाटली डोळ्यांमधली लाज आडवी आली
खुलून पुन्हा ऐन हिवाळी वसंत धावून आला
अहा! उमगले आता का हे रंग उतरले खाली
फुलांवाचुनी सारी काया बेरंगी ती झाली
रंग हरवले होते ना मग कसे रमावे कोणी
सुकून गेली रंग सोडुनी पाने हिरवी ओली
विरह असा तो रंगांचा मग सहावला बघ नाही
म्हणून त्यांनी रंग घेतले उधार थोडे काही
गेले रंगून जराजरासे कुंद वास ही धरला
ऋतू फुलांचा आठवण्याचे कारण आता नाही
शरदामध्ये माझे ही रे असेच काही होते
तुझ्या वाचुनी सारे काही बेरंगीसे दिसते
ओढुन घेते मी ही मग तो जुना बहर फुलांचा
शुष्क वनातील मी फुलणारा वसंत होउन जाते..