मराठी कविता
मुक्त बंधन

मुक्त बंधन

तुझं माझं नातं….
कशानी बरं बांधायचं?
आहे का कुठला वृक्ष ज्याला
काही दोरे बांधून तुला कायमचं
गुंतवून घेता येईल माझ्यात…..
नाहीच….
काय करू?
श्वासांना गुंतवू तुझ्या अवतीभवती?
त्यातच बांधला जाशील…
त्यात तरी बांधल्या जाशील ना..?
की नाहीच..?
अरे हो..
तू तर सगळ्या बंधनांच्या पलीकडे आहेस ना!!
मला तर वाटतं की
तू यमुनेसारखा वाहत राहशील असाच…
ह्या त्या खडकाला धडकत
काठावर तुला स्पर्श करू पाहणाऱ्या
प्रत्येकाला सोबत घेऊन…
पुन्हा कधीही वळून न बघण्यासाठी….
तसं असेल तर मलाही घेऊन जा
सोबत, त्याच प्रवाहात…
काठावरच उभी असेन मी..
मग वाहत राहील तुझ्याच सोबत..
तुझ्या प्रवाहात..
नेहमी करता….
तुझ्याच अस्तित्वाचा एक थेंब बनून
तुझ्या सारख्या सतत वाहणाऱ्यासोबत
हे मुक्तपणे वाहण्याचं बंधन
आवडेल मला!!!

– मानसी

error: Content is protected !!