घर का भेदी

बबन्या गावातला द्वाड मुलगा!! खोड्या काढणारा, कुणाला न जुमानणारा, अतिशय आगाऊ मुलगा! त्याची बोलती जर कुणासमोर बंद होत असेल तर आईसमोर, बाकी बापालाही तसा तो जुमानत नव्हताच.  मग बाप मात्र त्याला चांगलाच लाथाडायचा.  बबन्याच्या करामतीही तशीच असायच्या.कधी गावातल्या लोकांना त्रास दे, कधी बायकांची मजा उडव, कधी येणाऱ्या जाणाऱ्यांना वाकड बोल, तर कधी मुलींना उगाच त्रास दे; त्याचे हे थेर पाहून बापाकडे तक्रारी यायच्या अन् मग बाप ह्याला पिटायचा. ह्याच्या जिव्हाळ्याचं असं कुणीच नव्हतं. आईवर ह्याचा जीव, कारण ह्याला माहीती होतं फक्त आईच त्याला बाबांपासून वाचवू शकत होती. आणि आईलाही खात्री होती, बबन्या कधीतरी सुधरेल.  म्हणून आज पर्यंत बबन्या त्या घरात टिकून होता.
पण एक दिवस मात्र बबन्यानी आईच्या विश्वासाला देखील तडा दिला. त्यानी आईने घरासाठी राखून ठेवलेले पैसे चोरले.  त्याच्या आईच्या लक्षात ही गोष्ट आली, त्यावेळी मात्र तिला फार राग आला, वाईट वाटले, आता तिच्या हे लक्षात येत होतं की बाबा बरोबर होते. त्यांनी बबन्याला शिस्त लावायला, त्याला वठणीवर आणायला मारलं, त्यावेळी आपणच त्यांच्यावर रागावलो. पण बाबांच वागणं खरंच योग्य होत. आता आईनी पूर्ण सत्ता बाबांच्या हाती दिली आणि बाबांना पैसे चोरी बद्दल सांगितले. बाबांना बबन्याची ही कारस्थानं आधीपासून ठाऊक होतीच, पण आईला विश्वास बसेना. पण त्यादिवशी मात्र बबन्याला त्यांनी धू धू  धुतला! आज आईही काहीच बोलत नाहीये म्हणून बबन्याला मात्र चांगलाच धक्का बसला.  तो आवासून पाहतच राहिला. आता काय करावे?? त्याला काही कळेच ना.
दोन दिवस सुजल्या अंगानी बबन्या फिरत होता. आईनेही त्याला औषध पाणी विचारले नाही. पण बबन्याच्या शेजारी राहत असलेल्या आजीला मात्र ह्यात नाक खुपसायला चांगली संधी मिळाली. ह्या आजीचा बबनच्या आई बाबांवर, खरं तर आईवरच विशेष राग. त्यामुळे आता त्याच्याच मुलाला त्याच्याविरुद्ध चिथवायची ही चांगली संधी होती. त्यांनी बबनचं सुजलेलं अंग बघून त्याला मलम पट्टी केली, छान हळद दूध देऊ केलं आणि सांगीतल, “बघ तुझ्या आईला तुझ्या बाबाना समजावता आलं असतं, पण ती नाही बोलली. मी तुझ्या बाबांना समजवतेच कशी बघ, मी बोलल्यावर ते अजिबात हात उगारणार नाहीत बघ. बर सोन्या मला जरा मदत करशील?”
बबन्याला वाटलं, चला झालं आपलं काम, तो निर्धास्त. “आजे, तू सांग ना मला, मी करेन. पण बाबांचा माज उतरव. लय झालं आता, सत्ता आता मलाच पाहिजे. तू मदत कर. ” झालं, आजींनी हो म्हंटल आणि बबन्याला कामाला जुंपलं.
कधी दळण आण, कधी वाण सामान आण, कधी अंगण झाड, कधी आपल्या घरच्या पैशातून काही वस्तू आण. एकीकडे हे, तर दुसरीकडे बबन्या आणि बाबांमधलं युद्ध मात्र सुरुच होतं. आई मात्र बाबांच्या मागे ठामपणे उभी होती अन् बबन शेजारच्यांच्या मदतीची वाट पाहत होता. हळुहळू शेजारचे सगळेच बबनचा वापर करून घ्यायला लागले. ते त्याच्या कडून काम करून घेतं आणि फक्त आश्वासनं देत की तुझ्या बाबांशी आम्ही बोलू, त्यांना समजावू,  त्यांना रागावू, माघार घ्यायला लावू ; पण असे काही होतांना दिसत नव्हते. एकीकडे बबनच्या आईला हे कळत होते की आपलाच पोरगा बाहेर जाऊन घराविरूद्ध गरळ ओकतोय, तिनी बरेचदा बबनला समजवण्याचा प्रयत्न केला पण बबन काही समजला नाही. पण एक दिवस मात्र तिनी न रहावून शेजारच्यांना फटकारलं, “आमचा मुलगा तारतम्य सोडून वागत असला तरी आम्हाला तुमचा आमच्या घरात हस्तक्षेप नकोय. आम्ही आमचं पाहून घेऊ.”
बबनच्या आईचा हा अवतार पाहून शेजारच्यांनी नमतच घेतलं, अर्थात कितीही राग, हेवा काहीही वाटत असलं तरी त्यांना बबनपेक्षा त्याचा आई वडीलांशी संबंध टिकवून ठेवायचे होते आणि आता त्यांना हे कळलं होतं की ही मंडळी गाफील नाहीत.
आता ती मंडळी बबन्याला टाळू लागली. “आम्ही तुला मदत करू शकत नाही, तू जाणे न तुझा बाप जाणे, घरच्या लफड्यात आम्हाला नको ओढू”,  असे म्हणून आता त्यांनीही बबन्याला दूर लोटले. आतापर्यंत ज्यांच्या जीवावर तो उड्या मारत होता, त्यांनीच बबन्याला दूर लोटलं, पण त्यापूर्वी त्या सगळ्यांनी बबन्याचा हवा तसा वापर करून घेतला होता. बबननी खूप प्रयत्न केले शेजारच्यांचं मन वळवायचे पण आता प्रत्येकाला तो नकोसा झाला होता. त्याच्या हात पसरण्याची आता सगळे मजा उडवू लागले, “आपल्याच घरच्यांविरुद्ध इतरांचे दार ठोठावण्यात कसलं आलंय शहाणपण, त्यापेक्षा आईचं ऐकलं असतं तर..” हे ऐकून बबन्याला आपलीच लाज वाटली.
परिणामी बबन्याला वडलांपुढे शरण जावेच लागले..
सुरवातीला जरा अवघड गेले पण हळुहळू बबनला त्याच्या वडीलांचे रागवणे कळू लागले, तो ही जरा सुधारला. अभ्यासात लक्ष घालू लागला! परिणामी त्यावर्षी तो एक उत्कृष्ट विद्यार्थी म्हणून पुढे आला…
आता मात्र बबन आणि वडीलांचं नातं खरंच खूप सुंदर झालंय! अरे हो, आणि ह्या सगळ्यात सुखी कोण असेल तर ती आई आहे…! कारण आता तिच्या घरात शांतता नांदतेय आणि स्थैर्य ही!!
(हे बबनराव तर सुधारले पण असे अनेक बबन सध्या वावरत आहेत आजूबाजूला, सुधरतील का ते?? देवच जाणे…)

error: Content is protected !!