जागतिक पुस्तक दिवस.
हाथ में आ जाती हैं
तो बोल पडती हैं किताबें
आँखों से गुजरकर
होंठों पर मुस्कान लाती
है किताबें
पुस्तकांचं वेड असतं.. ते लागतंच.. बस थोडा दिल और दिमाग उसके हवालें कर दो.. और फिर देखो..
पुस्तकांना सगळेच मित्राची उपमा देतात.. आणि ते खरं ही आहेच.. जेंव्हा कुणी सोबत नसतं तेंव्हा पुस्तकं कमालीची साथ देतात.. हे मला जरा उशीराच कळलं.. भारतात असतांना माझ्या आजूबाजूला चालते बोलते पुस्तकं, म्हणजे माझे मित्र – मैत्रिणी होते. तेंव्हा मला माणसं वाचायचं वेड होतं, तुफान वेड!!! माझ्या आजूबाजूला असंख्य माणसं होती, त्यांना समजणं, त्यांच्या बद्दल जाणून घेणं, त्यांना वाचणं आवडता छंद..
त्यात चांगले, थोडे वाईट अनुभव पदरी पडले.. मी शिकत गेली..
बरेचदा हात सुटले, काही नविन जोडल्या गेले..
मी शिकत गेली..
चेहरे, आवाज नजरेआड होत गेले, नविन येत गेले मी शिकत गेली…
त्यामुळेच कदाचित कागदावरची अक्षर ( अभ्यासाची पुस्तकं आणि काही ठराविक लेखकांची – कवींची पुस्तकं सोडली तर) फार डोळ्याखालून गेली नव्हती. खरं तर अभ्यासाची पुस्तकंच फार हाताळलीत. विषयचं तसे होते.
पण मग सिंगापूरी उड्डाण झाले आणि अचानक माणसंच दिसेनाशी झाली.. रोज किमान 100 लोकांची तोंड पाहणारी मी बाहेर अनोळखी चेहर्यांमधे रमायचा प्रयत्न करत होती पण मजा नहीं आया.. मग सुरुवात झाली वाचनाची… परत अभ्यासाची पुस्तकं आणि काही नविन. सुदैवानी अजितलाही वाचनाचं ( माणसं वाचायचं नाही ) वेड होतं. त्यामुळे मला सोबत मिळाली. अजितचे विषय, आवड वेगळे होते त्यामुळे मला भाषा आणि मेडिसिन व्यतिरिक्तही इतर विषय वाचता आले.. आणि मग परिघ वाढतच गेला.
नेदरलॅंडस् आल्यावर माझ्या क्लिनिक मधे खजिनाच होता. माझी डच सहकारी अलिझ ही सुद्धा पुस्तक वेडी.. तिच्या घरी ती जिथे जिथे जाईल, अगदी बेडरुम, ऑफिस, साॅना, प्रत्येक टाॅयलेट, कार, वेटिंग रुम सगळीकडे एक लहान किंवा मोठं कपाट असतंच पुस्तकाचं. तसंच इथे एक मस्त पद्धत आहे, घराबाहेर, एका छोट्या कपाटात काही पुस्तकं ठेवायची. ज्याची इच्छा असेल त्याने हवं ते पुस्तक घेऊन जावं आणि असल्यास पुस्तक आणून ठेवावं. मला हा प्रकार फारच आवडला आणि विशेषतः ही कपाटं नेहमी भरलेली असतात ती वेगवेगळ्या पुस्तकांनी. आणि हो, ही संपत्ती अशी आहे जी कुणी चोरून नाही नेत, तर प्रत्येक नवं पुस्तक नवा अनुभव देऊन जातो आणि अनुभवाची फक्त देवाण घेवाण होते..
इथे गांधी केंद्रातही भारतीय दूतावासाचे सुंदर वाचनालय आहे. तिथे विविध पुस्तके पाहून मन हरखून जातं. परत मुलांमुळे डच पुस्तकही वाचायला लागलेय आता.
आणि हो… नेदरलॅंडस् मला माझा आवडता छंद सुद्धा पुन्हा जोपासता आला; माणसं वाचण्याचा. इथेही खूप माणसं जोडल्या गेलीत, त्यांनाही वाचण्याची संधी लाभली. पुन्हा कडू गोड अनुभव, पुन्हा आवडेली आणि मनाला भिडलेली संग्रहीत केलीत; माणसं आणि पुस्तकं दोन्हीही.. काही पुस्तकं मित्रांनी भेट दिलेली, काही मी मागुन आणलेली, काही स्वतः विकत घेतलेली, काही वाचानालयातली, काही मुलांसाठी मागवलेली सगळी – सगळी पुस्तकं आणि त्याच सोबत आयुष्यात आलेली आवडती – नावडती माणसं.
पण आता ही पुस्तकं शिकवत नाहीयेत, ती फक्त अनुभव देत आहेत, अगदी भरभरून आणि मी दोन्ही हात पसरून ते घेतेय, गच्च मिठी मारून त्यांना मनात साठवतेय आणि त्यांचे गंध उरात, अगदी आत पर्यंत भिनतायेत…
जागतिक पुस्तक दिवसाच्या अश्याच गंधाळलेल्या शुभेच्छा!!