पैलतीरावर
सर कुणाची…

सर कुणाची…

कधीतरी खूप भिजावसं वाटतं, अगदी चिंब आणि भरूनही आलेलं असतं बाहेर.. काळोख दाटलेला असताना आपण दूर दूर बघत उभे असतो खिडकीत, दिसत असतं त्या भरून आलेल्या ढगांचं वाहणं. मग एखाद्या ठिकाणी दूरवर, एखादा ढग रिता होतांना दिसतो अन् त्या ढगांमधून कोसळणाऱ्या सरी बघतांना त्यात भिजणारी, आपल्या पासुन लांब असलेली ‘ती’ जागा, कुठली माहीत नाही, पण आपल्याच जमिनीशी जोडल्या गेलेला कुठला तरी भूभाग तो, तो ही दिसत असतो. दिसत असतो म्हणण्यापेक्षा जाणवत असतो. त्याचं भिजणं आपल्याही नकळत आपण अनुभवत असतो… कुठेतरी कुणीतरी भिजतंय ह्याचा आनंद असतोच पण ती सर आपल्याला दिसतेय अन् तरिही आपल्या पर्यंत पोहचत नाहिये, ह्या विचारानी मन कासावीसही झालेलं असतं.. तिथे इर्षा नसते, पण हेवा नक्कीच वाटतो.. मलाही मिळायला हवी ती सर.. अशी एक साधी सरळ इच्छा..
पण ती पूर्ण होता होता आपणं मात्र कमालीचे अस्वस्थ झालेले असतो…  पण ती सर आपल्यावर काही कोसळत नाही… मग मन खट्टू होतं, वाट पाहून पाहून आपण थकतो, खिडकीत उभं राहून पायही थकतात..
असो, सर नाही तर चहा सही.. असं म्हणत आपण स्वतः साठीच एक कडक आलं घातलेला चहा करून आणावा अन् त्याचं क्षणी पावसाचे काही थेंब आपल्यावर मेहरबान व्हावेत.. आणि मग पुढचा क्षण चिंब भिजण्याचा.. काही काळापूर्वी आलेलं मळभ धुवुन मन पुन्हा गुलाबी करणारा…
मग भिजत राहतो आपण नखशिखांत…. केसांमधून, पापण्यावरून, ओठांवरून अगदी शरीराच्या प्रत्येक भागावरून ओघळत जाणारे थेंब, त्यांचे स्पर्श, अनुभवत राहतो.. असेच.. कितीतरी वेळ… तृप्त होत राहतो
आणि तेंव्हाच दूर कुठेतरी, कुणीतरी आपलं हे भिजणं, आपली ही सर अनुभव असतो, न भिजताच… त्याच्या डोळ्यांनी, त्याच्या खिडकीत उभा राहून.. त्याच्या सरीची वाट बघत… चिंब भिजण्यासाठी…

error: Content is protected !!