शब्दांमधे काहीतरी असतं, नक्कीच असतं, कुठलं तरी रसायन, कुठलंस समीकरण, कुठलासा ताल, जराशी लय, कुठलेतरी स्वर…काहीतरी जादू.. काहीतरी तर नक्कीच असतं…
जेंव्हा ते आतून उन्मळून येतं आणि सहजच ओठांवर किंवा कागदावर किंवा आता हातात असणाऱ्या स्क्रीन वर उतरतं तेंव्हाच त्यांची जादू आपल्यावर व्हायला सुरवात होते.
आणि जेंव्हा हे आपल्याला जाणवायला लागतं तेंव्हाच कुठेतरी आत काहीतरी उमलतं, सारं काही बहरायला लागतं…
आणि ती जादू असते त्या शब्दांची, त्यात वसलेल्या भावनेची.. भाव, जो मनाला भिडतो, हृदयाच्या प्रत्येक कोपर्याचा ठाव घेतो आणि मग एकतर ओठांवर नकळत हसू उमटतं किंवा डोळ्यात पाणी तरी तरळतंच..
हिच ती जादू , त्या शब्दातल्या स्पंदनांची, त्याच्या गर्भात उमलणार्या भावाची….
डॉ. मानसी सगदेव – मोहरील