पैलतीरावर
श्रवणीय

श्रवणीय

बर्‍याच वर्षांनी देशपांडे कुटूंब गावी आलं. अमेरिकेतून आले की मुंबईत राहून लगेच परतीचा प्रवास असायचा. गावी चुलत घराणं होतं, पण फोनवरच काय तो संपर्क साधला  जायचा. पण ह्या वर्षी मात्र सगळेच गावी आले, त्यात ह्यावेळी सोबत आदित्यही. आदित्य देशपांडे, वय वर्ष 17, ह्याची बर्‍याच वर्षानंतरची ही गावाकडे चक्कर. बाॅर्न अँड ब्राॅट अप अमेरिका, समजुतदार, आपल्या मूळ ओळखून असणारा पण तरिही अमेरिकेनच. पण त्याला एक मोठी वाईट सवय होती; हेडफोन्स वापरण्याची…कुठेही गेला की कान आपले ह्याचे झाकलेलेचं. त्याच्या ह्या सवयीमुळे त्याचे आई बाबा ही वैतागले होते. गावात येताना बजावून सांगीतलं होतं की ईथे हे असं चालणार नाही. लोकांशी बोलायचं, जरा चार चौघात मिसळायचं. पण काही उपयोग झाला नाही. आल्या पासून तो आणि त्याची गाणी.. फक्त चार्ज करण्यापुरताच काय तो हेडफोन्स काढायचा. एवढंच काय तर रात्री झोपताना देखील त्याला त्याचे हेडफोन्स लागायचेत.  त्याशिवाय त्याला झोपच येत नव्हती. हे सगळं पाहून गावातले लोकं कुजबूज करू लागले.. “देशपांडेच्या नातवाचे कान खराब हायेत म्हणे, कानाले मशीन लागली हाए” “बोलता पन नाई येत बिचार्‍याले” हे सगळं ऐकून आदित्य ची आजी मात्र वैतागली आणि नातवाची ही सवय मोडायचीच असं ठरवून मोकळी झाली. दुसर्‍याच दिवशी पहाटे आजीनी आदित्यचे हेडफोन्स लपवलेत. आदित्य उठल्यावर हेडफोन्स शोधू लागला, त्याला ते काही सापडले नाहीत. त्यानी अख्खी रूम शोधली, सामानात शोधला, घरभर सगळी कडेच तो शोधू लागला पण हेडफोन्स काही सापडले नाहीत. तो कावराबावरा झाला. त्यानी आईला आवाज दिला, “आई माझे हेडफोन्स कुठे आहेत?” “दिवसभर कानाला लावून हिंडतो मी काय सांगू?” आदित्य रडकुंडीला आला. तेवढ्यात आजी आली, “आदि, चल बाळा आपल्याला आज एका लग्नात जायचंय. काय झालं? तू का वैतागला आहेस?” आजीला आदित्यने सगळं सांगितलं, आजी म्हणाली, अरे एवढंच ना? सापडेल ते, नाही तर मी तुला नविन घेऊन देईल. ” अगं, आजी तुला माहितीये का किती महागाचे आहेत ते. हायटेक क्वालिटी, नाॅइस कँसलेशन. इथे कसं मिळणार? ” तणतण करत तो निघून गेला. दुपारी गावातच लग्नघरी गेला असताना वराती पूर्वीच काही पोरं काड्या आणि टिनाचे डब्बे घेऊन वाजवत होते. त्यांनी त्यांचा बनवलेला हा ढोल ताशा बघून आणि त्यावर धरलेला ठेका बघून आदित्यला फार मजा वाटली. लग्नात चार लोकांशी बोलून तो मोकळा झाला. संध्याकाळी सगळ्यांनी गच्चीवर एकत्र झोपायचा प्लान बनवला. गप्पा गाणी ह्यामध्ये सगळ्यांनी खूप मस्ती केली. पहिल्यांदाच आपले भावंड आणि त्यांचे मित्र ह्यांच्याशी बोलून, त्यांच्यासोबत वेळ घालवून आदित्य सकाळचं हेडफोन्स प्रकरण विसरला होता. रात्रभर सगळ्यांनी धमाल केली. पहाटे चिमण्यांच्या चिवचिवाटामूळे त्याला जाग आली. तांबड फुटताना त्यानी पहिल्यांदाच पाहिलं, त्यात ही पक्षांची किलबिल, आज पहिल्यांदाच त्याने हे सारं अनुभवलं होतं. त्याच्या कानांना हा आवाज नवा होता, पहाटेच ते चित्र बघून तो मंत्रमुग्ध झाला आणि नकळत त्याच्या डोळ्यात पाणी आले. हा नजारा, हे आवाज, ही माणसं, त्याला बरेच अनुभव देऊन गेले. फक्त अर्धा दिवसात आणि ह्या एका पहाटेने त्याचं विश्व जरा बदललं होतं आणि हा बदल त्याला आवडू लागला होता. आपल्याच विश्वात रमणाऱ्या आदित्यला एका नव्या विश्वाची चाहूल लागली होती. त्यानंतर गावात असे पर्यंत त्याने हेडफोन्सचा विषय काढला नाही. त्याला त्याची गरजच भासली नाही. निसर्गाच्या मधूर स्वरांनी आणि आपल्या आजूबाजूला असणाऱ्या माणसाच्या आवाजांनी त्याच्या कानांवर आणि परिणामी मनावर जादू केली होती..बंद कानांपेक्षाही उघड्या कानांनी अनेक श्रवणीय स्वरांना कायम रुपी स्थान मिळवून दिलं होतं.

error: Content is protected !!