पैलतीरावर
गंध

गंध

आज सकाळ पासून मन जरा अस्वस्थच होतं. खळखळ वाहणाऱ्या झऱ्यासारखी ती आज आतून वादळासारखी होती मात्र वरून अगदीच शांत भासत होती. वादळ आतल्याआत शमवण्याची तिची ताकदही अफाट होती.. असं आज होत नव्हतं, कित्येकदा हे वादळ तिच्या मनात घोंगावत असे, पण बाजूला बसलेल्याला कळेल तर नवलच. पण मग ती लगेच खुलायचीही. एखादं गाणं ऐकून किंवा आवडीचं पुस्तक वाचून किंवा एखाद्या विचारानी म्हणा अगदी कसही….आजही तसंच.. घरी सगळं सुरळीत सुरू होतं, पण मनात प्रचंड अस्वस्थता आणि ओठांवर शांत हसू.. काहीही न बोलणारं हसू.. कारणही तसंच होतं. त्याची अन् तिची अचानक नजरानजर झाली होती, एकदाच, क्षणभर.. मनीध्यानी नसताना आज तो भेटला आणि त्याच्या गंधानीच ती मोहरली. त्याची ती मिठी, त्याचा डोक्यावरून फिरणारा हात, तो स्पर्श एका नजरेत सारं अनुभवलं. आणि हेच कारण होतं तिच्या अस्वस्थतेचं. इतक्या सहज मन झुकलं? का? कसं? कसं? ह्या “कसं” मुळेच ही सारी अस्वस्थता…पण याही पेक्षा जास्त त्रासदायक होतं ते मोहरणं. हे असं मोहरणं? आत्ता? दोघेही आपापल्या संसारात रमलोय, खरं तर आता मागे सुटलं ते सगळं, मग का असं झालं? हा विचार येताच तिला अपराधीपणाच्या भावनेनी घेरलं आणि तिला अचानक गुदमरल्या सारखं झालं. थोडं मोकळं व्हावं म्हणून ती बाहेर आली. तिने फुलवलेल्या बागेत एरवीही सुखावून जायची ती. चार क्षण तिथे घालवावे म्हणून ती गेली आणि कसल्यातरी गंधाने पुन्हा मोहरली. हा गंध? आता हिवाळ्यात? म्हणून बेचैन होऊन सगळीकडे शोधू लागली आणि बघते तर काय खरोखर तो बहरला होता; तिचा आवडता मोगरा.. डिसेंबरच्या थंडीतही बहरला होता, अगदी त्याचा ऋतू नसतानाही आणि त्याचा सुगंध सगळीकडे दरवळत होता. आता तिला अचानक हलकं वाटू लागलं, मन मोरपीसासारखं तरंगू लागलं. आता मात्र तिला तिच्या मोहरण्यात काहीही गैर वाटत नव्हतं.. आज तिच्यातला मोगरा पुन्हा एकदा गंधाळला होता आणि त्याच्या मोहरण्यानी तिचं सारं जग सुद्धा…

error: Content is protected !!