पैलतीरावर
दृष्टी

दृष्टी

सकाळी उठल्या उठल्या रेवतीने पलंगाच्या बाजूला असलेला टेबल चाचपडला  ते हाताला बांगड्या लागतील म्हणून; पण टेबल रिकामाच. आणि तिच्या लक्षात आलं की महिना झाला हातात बांगड्या घातल्याच कुठे? आणि ह्या विचारानीच तिला रडू कोसळले.
रेवतीला बांगड्याचं प्रचंड वेड. लग्नानंतर तर हिरव्या बांगड्या तिच्या हातात नेहमीच असायच्या. तसा हिरवा रंगही तिचा आवडताच. कपाट सगळ्या हिरव्या शेडस् नी भरलेलं. प्रत्येक वेळी दुकानातून एक तरी हिरवा ड्रेस घरी यायचाच आणी मग तिचं रडरड करायची, मला इतर रंगाचे कपडे नाहीत म्हणून आणि मग पुन्हा खरेदी आणि पुन्हा हिरवा रंग.
तिच म्हणणं होतं, हिरवा रंग ऐश्वर्याचा आणि समृद्धीचा.  त्याकडे पाहिलं की कसं मन प्रसन्न होतं. श्रावणात तर ती वेडी व्हायची. पाऊस आणि हिरवळ!! अहाहा… ह्या विचारानी देखील खुलायची ती. तिच्या डोळ्यांचं तिच्या ह्या हिरवळीवर फार प्रेम.
पण आता त्याच डोळ्यांना ही हिरवळ दिसणार नव्हती. महिनाभरापूर्वी एका अपघातात तिची दृष्टी गेली. वयाच्या ह्या कोवळ्या वळणावर अंधत्व आलं. कालच ती हॉस्पिटल मधून घरी आली होती. ह्या अपघातानंतरची तिच्याच घरातली ही तिची पहिली रात्र. बाकी सगळं तर ओळखीचंच होतं, पण दिसत काही नव्हतं. रात्र आपल्या लोकांच्या सहवासात गेली आणि सकाळी सवयी प्रमाणे तिने साईड टेबल वर हात फिरवला. पण आता बांगड्यांची जागा औषधांनी घेतली होती. आपला हिरवा रंग ही आता आपल्याला कधीच दिसणारं नाही ह्या विचारानी ती उद्विग्न झाली.
रडताना पाहून आनंदनी तिला सावरायचा प्रयत्न केला. तिला आवरून दिलं, तिच्या आवडीचा हिरवा ड्रेस घालून, कंच हिरव्या बांगड्या घालून तयार करून दिलं आणि म्हणाला “तुझ्या आवडत्या मित्राला भेटून येऊ चलं.”
“माझा मित्र??” रेवती गोंधळली. अजून पुरती सावरली नव्हती, पण प्रयत्न ती सुद्धा करतच होती. तिने आनंदचा हात धरला आणि दोघे घराबाहेर पडले.
पोहोचले ते एका गावात, तिथल्या गारव्यानी रेवती सुखावली पण आपण कुठे आलोय ह्याची कल्पना तिला नव्हती. त्या जागी पोचताच आनंदने रेवतीला हात पुढे करण्यास सांगितले व हातात एक रोप दिलं.
“रेवा, तुझ्या मित्राशी तुझी ही मैत्री मला फार खुपत होती. पण वाटलं की तुझा आनंद त्यात तुझ्या आनंदचा आनंद. म्हणून मी तुझ्या करता आणि तुझ्या ह्या आवडत्या हिरव्या रंगाकरता हे फार्महाऊस बुक केलंय. आता तू आणि तुझी हिरवळ कायम सोबत असाल. लाव जितकी झाडं लावायचीत.
हे ऐकून रेवतीने ते हातातलं रोप उराशी कवटाळं आणि अश्रूंना वाट मोकळी करून दिली. दिसत नसली तरी ही खरीखुरी हिरवळ कायम तिच्या जवळ असणार होती. न दिसताही तिचं हे हिरवळीवरच प्रेम तिला जपता येणार होतं. कोण म्हणतं रंग फक्त डोळ्यांनीच दिसतात…. 

error: Content is protected !!