हक्काचं अतिक्रमण
एखादी जागी असते, अशीच, कुणाच्या तरी मालकीची (किंवा मालकी नसलेली ही) ज्यावर कुणीही अधिकार गाजवणारं नसतं.
मग अचानक कुणीतरी येऊन तिथे अतिक्रमण करतं, आपलं बस्तान बसवत . खरं तर ती जागा त्या आलेल्या व्यक्तीची नसतेच पण तो येतो… अगदी जबरदस्तीच.. किंवा नकळत आपलं स्थान तिथे निर्माण करतो; आपलं बस्तान बसवतो आणि मग जशी काही ती जागा त्याचीच होऊन जाते.. त्या जागेलाही हळुहळू तो हवाहवासा वाटू लागतो
त्याच्या अस्तित्वाच्या खुणा दिसू लागतात ती आपल्या अंगावर मिरवत राहते. तिथले रंग बदलू लागतात, तिथली जमिन बदलू लागते, तिथला गंध बदलू लागतो.. आणि मग एखाद दिवस तो कुणीतरी आपली जागा बदलू पाहतो, आपलं सगळं बस्तान दुसरी कडे हलवू पाहतो आणि मग ही पहिली जागा ओसाड पडते. खरं तर असतं ते अतिक्रमणच पण ते ही सवयीचं झालेलं असतं. त्या एकाच कोपऱ्याचे बदललेले रंग सतत त्या गेलेल्या व्यक्तीची आठवण करून देत असतात. खरं तर आता हक्काची जमिन मोकळी झालेली असते पण तरिही नको वाटते ती मोकळीक, नको वाटतो तो रिकामा कोपरा. आता ते अतिक्रमण हवं असतं.
त्या जागेच्या कणाकणात उणीव निर्माण झालेली असते एक प्रकारची. बरं, कुणी इतर यावं म्हटलं तरी पहिल्याची सर नसते त्याला. पहिला स्पर्श, पहिले गंध, पहिले रंग ह्यांची सर नंतर कशाला येईल का, हा ही प्रश्नच असतो. आता तोच हळवा कोपरा जगायचा असतो.. असाच काहीसं मनाच्या कोपऱ्याचंही होतं.. ह्यालाच प्रेम म्हणतात कदाचित ..