पैलतीरावर
बरेचदा आपण फक्त प्रश्नच घेऊन जगत असतो. हे असं का झालं? तसं का नाही झालं? किंवा भविष्यात असं होईल ना? नाही झालं तर मी काय करू?
पण आजचा विचार कुठेच नसतो.. ह्या न बदलता येणाऱ्या भूतापायी आणि आजच आपण घडवू शकणार्या भविष्यासाठी आपल्या हातात असलेला आज आपण गमावून बसतो. बरेचदा तर आपल्या हातात उत्तरंही असतात सगळ्या प्रश्नांची. पण आपलं प्रश्नांवर जास्त प्रेम असतं. कारण तो प्रश्न आपल्याला गोंजारत बसतो तर उत्तर कधी कटू सत्य असतं, आपल्याला आपलं खरं खरं प्रतिबिंब दाखवणारं; तर कधी खडबडून जागं करणारं, हात पाय हलवायला लावणारं, मेहनत करवून घेणारं असतं.
पण उत्तरं शोधणं आणि हातात आहेत ती उत्तरं मान्य करुन जगणं, हे जमलं न तर कुठेच ब्रेक लागत नाही..
प्रवाह सुरू ठेवण्या करता वाहणारी नदी सुद्धा कष्ट घेतेच ना! अडचण ठरणाऱ्या खडकांना एकतर वाहून नेते किंवा विशालकाय दगडांना आपल्या मर्जीने झिजवून मार्ग बनवते.
त्या दगडांना ती हारली तर मग तिचा नाला होतो. घाणीने भरलेला, कुजलेल्या वासाचा…
आयुष्याचही तसंच असतं… वाटतंय आजकाल असं.. जाणवायला लागलंय..
काहीतरी न मिळाल्यामुळे रडत बसायचं, नशिबाला दोष द्यायचा की मागे फिरून एक चक्कर मारून यायची भूतकाळात…आणि हवं तेव्हढंच उचलायचं आणि बाकी मान्य करून तिथेच गुंडाळून ठेवायचं आणि पुढे यायचं..
पुढे जायचं…आणि मग आपल्याला हवं तसं आयुष्य रंगवायचं.. आपले मागचे उचललेले अनुभव, आठवणी, लागलेल्या ठेचा, त्या पासून मिळालेले धडे आणि आज हातात आहेत ते श्वास…..
सगळं उधळायचं कॅनव्हास वर.. एका नविन चित्रा करता..
अडचणी येतील, काही रंग संपतील, काही वाळतील.. ठिक आहे.. नवा स्टाॅक काढायचा.. आणि रंगून जायचं..
मस्त मगन….एकदम…
कठीण चिवट प्रश्नांच्या तासांपेक्षा हा क्रिएटिव्हीटीचा तास मस्तच असतो……
मला आवडायला लागलाय आजकाल….