पैलतीरावर
कृष्ण

कृष्ण

कृष्ण म्हंटल की मन वेडं होतंच!
मन धावत जातं त्याच्या मागे; रानावनात, नदी काठी, दर्‍या- खोर्‍यांतून, तो जाईल तिथे; मन वेड्यासारखं धावत जातं. त्याचं अस्तित्व जाणवेल ह्या एका आशेवर मन धावत जातं, शोधत राहतं कृष्णाला! आणि तो भेटतोच… प्रत्येक ठिकाणी, प्रत्येक परिस्थितीत, वेदनेत, आनंदात, दुःखात, प्रेमात, विरहात सगळी कडे तो भेटतोच. साथ देत राहतो प्रत्येक वेळी.
हातात हात घेतो आणि घेऊन जातो पैलतीरावर, आपल्या सोबत, एका नव्या प्रवासाला; जिथे फक्त आणि फक्त आनंद मिळतो, समाधान मिळतं, शांतता प्राप्त होते, मनाला एक नवी उमेद मिळते! त्याच्या चेहर्‍यावर फक्त स्मित झळकत असतं आणि डोळ्यात आपल्याला सामावून घेण्याची ताकद.. त्याच्या हृदयाच्या कोपर्‍यात आपल्यासाठी एक जागा कायम राखून ठेवली असते त्याने आणि बाहूंत आभाळाएवढी विशालता! क्षमता, आपल्याला आपल्या सगळ्या ओझ्यासकट मिठीत घेण्याची आणि ते ओझं एका स्पर्शाने फक्त एका स्पर्शाने दूर सारण्याची. हे सारं त्या एका भेटीत.. तुझं अस्तित्व असंच जाणवत राहिल मला, तू सतत सोबत आहेस…खात्री आहे..

error: Content is protected !!