मोगरा
हा असा मोगरा बहरला ना की त्याचा सारा गंध तुझ्यापर्यंत पोहोचवण्याची धडपड असते माझी.. मग कित्ती तरी वेळ त्या मोगऱ्याच्या सानिध्यात घालवते. त्याचा सगळा गंध रोमारोमात साठवून घेते.. तो ही उधळण करत असतोच मुक्त हस्ते…
मग मी ही गंधाळू लागते त्या मोगर्यासारखी.. खुलते, बहरते अन् तुला भेटतांना फुलते.. त्या भेटीत मग सारा सारा गंध रिता करते, तुझ्या श्वासात, तुझ्या मिठीत, तुझ्या कणाकणात तो गंध भिनेपर्यंत तुझ्या सहवासात असते…
तेव्हा कुठेतरी तो मोगरा सुखावतो…
खरं तर मी फक्त माध्यम झालेय, तुमच्या ह्या देवाणघेवाणीचं… ह्या मोगर्याचं खरं प्रेम तर तू आहेस.. तुला गंध मिळावा म्हणून तो भरभरून देतो.. आणि त्याच्या गंधाने तू ही सुखावतो.. मधल्यामधे माझी मात्र पंचाईत..
त्याचा गंध स्वतःत सामावून घेणं आणि तो जपून ठेवणं फार कठीण, बरं का!
आणि मग तुला भेटून आल्यावर तू दिलेल्या अत्तराचा घमघमाट आणि त्यामुळे आलेलं तेज, दोन्ही लपवणं कठीण… पण तुम्हा दोघांचाही सहवास हवायं मला… जन्मोजन्मी असाच.. असंच गंधाळत रहायचंय.. तुझ्या सहवासात.. कारण तसं झालं तरच हा मोगरा फुलेलं आपल्यात.. आपल्यासाठी…