बकुळ
आज कित्येक दिवसांनी ती माहेरी आली होती. कितीही कार्पोरेट कार्पोरेट म्हंटले तरी माहेर आणि आपलं गाव, जिथे बालपण गेलं, लहानाची मोठी झाली, पहिल्या वहिल्या प्रेमाच्या आठवणी, तारुण्यातील गोड गोष्टी हे सगळं आठवतं आणि मन अगदी हळवं होऊन जातं. आणि ह्या सगळ्यात आवडती होती तिची नेहमीची पायवाट… पावसात चिंब भिजलेली पायवाट..
घरुन क्लासेसला जाताना तिला एक बाग लागायची. बाग कसली,घनदाट जंगलासारखाच भाग होता तो.. कुणाच्या तरी मालकीची बाग असावी; कुणी राजे नावाचं जोडपं होतं! फळ फुलझाडांनी भरलेली ती बाग! त्या बागेत तिच्या मैत्रिणींबरोबर तिने कित्येकदा भातुकलीचा खेळ रचला होता. त्या बागेतली एक पायवाट तिला फार आवडायची. त्या पायवाटेवरून कित्येकदा पावसाळ्यात ती अनवाणी जायची. तिथली ओली माती आणि त्या पायवाटेवर पडलेली काही बकुळीची फुले. त्या स्पर्शाने अगदी आत पर्यंत शांतता लाभायची तिला, मन हलकं होऊन जायचं. त्या फुलांचा गंध आणि मृद्गंध एकत्र होऊन आत पर्यंत रुजायचा. तो आजतागायत तसाच तिच्या मनात होता. कित्येक दुःख विसरली होती ती ह्याच पायवाटेवर चालतांना!
आजही त्या पायवाटेवरून चालण्याकरता तिचे वाॅकिंग शूज काढून ती चालू लागली, पण हे काय….. बकुळ कुठेय???
क्षणभर ती थबकली, ते एवढं मोठ्ठ बकुळीचं झाड तोडलं होतं..
तिच्या काळजात धस्स् झालं. का कापलं? की पडलं?? इथेही घरं होणारं की काय? बाग, ती तरी राहील का?? की इथंही सिमेंटचं जंगल आता??
ती तशीच चालत राहिली, कुठेतरी चौकशी करावी म्हणून ती तिथल्या चौकीदाराच्या झोपडीकडे वळली. तिथे नविनच माणसं होती. तिने तरिही विचारले, “ह्या इथे बकुळीचं झाड होतं,
एक? का तोडलं? काही झालं का?”
“ताई, लाकूड सडलं होतं हो, वाळवी लागली, तोडावं लागलं”
तिला रडूच कोसळलं. आता मागच्या वर्षीच तर आले होते मी, असं कसं झालं..
आज त्या पायवाटेवर काही तिला पूर्वीची शांतता लाभली नाही. मन सारखं भरून येत होतं. सारख्या तो बकुळीचा सुगंध आणि गेल्या पंचवीस- सव्वीस वर्षांच्या आठवणी मनात रुंजी घालत होत्या. मन भूतकाळात गुंतून गेलं. आणि आता बकुळही भूतकाळात जमा झाला होता. तिला अचानक हुंदका फुटला, श्वास दाटून आला, तिला तिथे थांबणंही शक्य नव्हतं. एका दगडावर बसून ती शूज घालू लागली तेव्हढ्यात तिला कुठेतरी बकुळ फुलांचा सुगंध आला. क्षणात धडधड वाढली आणि ती चौफेर नजर फिरवू लागली. सगळीकडे पाहिलं, पण कुठेही बकुळ वृक्ष नजरेस पडेना! तेव्हढ्यात एका वृद्धेचे बोल कानावर पडले, “अगं, आकाशातूनच पडणार का बकुळीची फुलं तुझी??
तुझं झाडं उंच होतं पण आता हे नवं झाडं तारुण्यात आहे बरं का!! लहान आहे गं, पण फांदी त्याच जुन्या बकुळीची. ओंजळ कर हाताची” अन् क्षणात तिच्या ओंजळीत बकुळीची फुलं अलगद येऊन स्वार झालीत.” क्षणात सारं काही बदललं. “राजे आजी, तुम्ही?”
“हो! मी लग्न करुन आले तेंव्हा लावलं होतं ते झाड, चाळीस वर्षाची साथ आमची. माहेराहून आणलं हो माझ्या! सासरी मोठी बाग आहे कळलं, मग आले घेऊन. बहरात रोज गजरा मिळायचे मी, मग हे गेले! गजरा माळणं बंद झालं. ती फुलं, माझ्यासारखीच उदास होऊ लागली! हळुहळू बहर कमी झाला. एक दिवस माळी म्हणाला, बुंधा खराब होतोय, झाड कापावं लागणार. खूप वाईट वाटलं, माझी माहेरची आठवण ती. पण खरं तर मीच नाही का वाईट वागले त्याच्याशी? प्रत्येक वसंतात हा फुलणार बहरणार म्हणून मी आनंदात असायचे कारण मला ह्याची फुले माळता येतील. पण फुले माळणं बंद केलं तशी त्यांची वाटही बघणं बंद झालं. मग वठणारचं ना ते! त्यालाही वाईट वाटणारचं! जून पर्यंत बहर राहायचा चांगला. माझंच लक्ष उडालं होतं.. मग काय.. त्याला म्हंटल बाबा ह्याचंच रोप तयार कर एखादं.. अन् लावलं झाडं! सहा महिन्यात बहरलं बघ! रोज बोलायचे त्याच्याशी, माफी मागितली, मनधरणी केली, तेंव्हा कुठे हसलाय परत!! मघाशी तुला चौकशी करताना पाहिलं, म्हणून मग आले घेऊन फुलं! फार बरं वाटलं, माझ्या नंतरही ह्या बकुळीला विचारणारं कुणी तरी आहे!! आता हा बहरत राहील असाच! फक्त त्याच्याशी बोल हो प्रत्येक वेळी येशील तेंव्हा!!” तिला अगदी भरुन आलं. डोळ्यात आसवांच्या धारा अन् आकाशातून पावसाच्या!! आभाळ भरून आलं, बघता बघता पावसानी सगळ्याचा ताबा घेतला! अन् सारं काही चिंब भिजून गेलं, पायवाट, बकुळ आणि तीही !!! पुन्हा एकदा तोच गंध, पुन्हा एकदा तेच समाधान, तिच शांतता…… पुन्हा त्या ओल्या पावसाळी पायवाटेवर नव्या बकुळाचा प्रवास सुरू झाला होता…. पुढच्या अनेक वर्षांकरता…
©️2021bhavagarbha
डाॅ. मानसी सगदेव मोहरील