मराठी कविता
पहाट गाणे
कृष्ण नभातून झरझरणारी
ओढ निराळी तुझ्याच साठी
अश्या पहाटे कवेत यावी
तुझी सावली यमुनेकाठी
तुझ्या मिठीतून वाहत येतो
गंध जरासा हवाहवासा
न्हाऊन जाते अलगद सारे
उरतो मागे श्वास नवासा
कुठेतरी मग पूर्व दिशेला
हळूच तांबडे नाचत येई
हरित तृणांची दाटी वाटी
कणकण सारे खुलून जाई
अश्याच वेळी जाग येऊनी
जराजराशी मिठी सुटावी
नजर भिडावी नजरेला अन्
पुन्हा पाकळी जरा मिटावी
तुझेच सारे स्पर्श उरावे
चराचरावर तुझीच छाया
तुला भेटूनी खुलून येते
गोड गुलाबी नाजूक काया
असेच सारे राखून ठेवू
तुझे नी माझे रंग नभीचे
तुझ्याच साठी आसुसलेले
ओठांवरती सूर कधीचे ……
Dr. Manasi Sagdeo-Mohril
0