झूम
आज सहज फेसबुक व्हिडिओ स्क्रोल करताना भाडिपा ह्या चॅनल वर झूम नावाची वेबसिरीज दिसली. पाच भागांची सिरीज! बनवली का? तर प्रॉडक्ट प्लेसमेंट!!
बिरा नावाच्या बिअरची ॲड करायला ह्यांनी ही वेबसिरीज बनवली. बरंय, मराठी माणसाला स्पॉन्सर मिळतोय! पण, ह्याच्या पहिल्याच भागात, आई – वडील आजोबांच्या श्राद्धाच्या पानावर बिअर आणून ठेवतात. ठिक आहे, आजोबांना आवडत असावी बिअर. मग नंतर मुलगा (नायक), सिगरेट पित बसला असतो, अचानक बहिण येते! तो तिला विचारतो की, कार्यक्रम कसा झाला?
बहिण- कसला डेंजर झाला. मला माहितच नव्हतं, श्रीसुत्र असं काहितरी असतं ते! त्या बायका ना 108 वेळा, तेच तेच मंत्र रिपीट करत होत्या. कुलकर्णी काका म्हणाले असं जिन्स घालून येत असतं का? नेक्स्ट टाईम मी रिपड् जिन्सच घालून जाणार आहे.”
लगेच पुढच्या सिनला तिच लहान बहिण आपल्या मोठ्या भावाला गर्लफ्रेंड सोबत कुठली बिअर प्यायची हे सांगत असते! सो कूल ना! एकदम आजच्या जमान्याचे!
पुढे संपूर्ण वेबसिरीज मध्ये जो तो बिअरचे फायदे, बिअर कशी प्यायची, कोणती प्यायची, बिअरचं कौतुकच कौतुक!!!
आई, बाबा, घरात शिरलेला एक गुंड, शेजारी पाजारी, मित्र, लहान बहिण सगळ्यांनी घरात बिअरवर पीएचडी केलेली दिसतेय. कूल, राईट?
पण मग ह्या सगळ्यात आपल्या संस्कृतीने तुमचं काय वाकडं केलंय??
तुम्हाला बिरा बिअरनी पैसे दिले, त्यांचे गोडवे तुम्ही गायलेत पण ह्यात श्री सूक्ताचा किंवा श्राद्ध विधीचा अपमान तरी का करावा? की त्याकरताही ह्या कंपन्या तुम्हाला पैसे देतात?
आजकाल सगळीकडेच एक फॅशन आलेली आहे. आपल्या संस्कृतीची, आपल्या आई – वडीलांची ( ते जर असे दारू पीएच.डी होल्डर नसतील तर), देशाची, आपल्या प्राचीन ठेव्यांची, उपचार पद्धतीची, देवांची मजा उडवायची आणि त्याला विनोद असं नाव द्यायचं. हे सगळं कसं कूल नसतं, ह्या सगळ्यांवर विश्वास ठेवणारे कसे मूर्ख आहेत, आपण; त्याला न मानणारे; कसे शहाणे आहोत हे सगळे म्हणजे प्रसिद्धीचे सोपे मार्ग!
नव्या पिढीला आपली संस्कृती कशी वाईट आहे आणि पाश्चात्य संस्कृती कशी चांगली हेच शिकवलं जातंय. पण ज्या पाश्चात्य संस्कृतीचे तुम्ही गोडवे गाता, ती पाश्चात्य संस्कृती आपल्या मुळांना अजूनही धरून आहे आणि म्हणूनच मोठी होत चालली आहे. तुम्ही भारताबाहेर कुठेही जा, लोकं आपली संस्कृती, आपलं खान पान, उपचार पद्धती सोडत नाहीत. युरोपात कुठेही तिथली स्थानिक भाषा आवर्जून बोलल्या जाते, कुठल्याही धर्मातले लोकं आपल्या प्रार्थनास्थळांना आवर्जून जातात. आपण मात्र आपलं सोडून भलत्याच्या मागे धावतो.
पाश्चात्य संस्कृतीकडून घ्यायचं असेल तर आपलं मूळ कसं जपायचं हे सुद्धा शिकूया ना! आपल्या देशावर प्रेम कसं करायचं, स्वच्छता कशी राखायची हे सुद्धा शिकूया, वेळ कशी पाळायची हे सुद्धा शिकूया!
मान्य आहे समाज माध्यमांचे दोन चेहरे असतात, पण आपणंच आपल्या संस्कृतीचा ऱ्हास करण्यात का हातभार लावतोय? प्रत्येक उत्सवात का आपण टवाळखोरीची भाषा वापरतो? का आपल्याच संस्कृतीची मजा उडवायची.
किंवा तुम्हाला जे दारू, सेक्स, उघड्या अंगाचे प्रदर्शन करायचे ते करा पण आमच्या संस्कृतीला, आमच्या विश्वासाला का धक्का पोहचवताय?
ह्या सगळ्याला कुठेतरी रोखायलाच हवं. आपल्या संस्कृतीचं, आपल्या संस्कारांचं जतन आपणच करायला हवं!
सध्या जमाना वेबसिरीज, ओटीटी प्लॅटफॉर्मचा आहे. आपणच निवडू शकतो की काय घ्यायचं, काय सोडायचं. कुणाला मोठं करायचं आणि कुणाला आपटायचं. मान्य आहे एक दोघांच्या विरोधाने काहीही होणार नाही पण कधी ना कधी, कुठे ना कुठे बदल होईल हे नक्की.