मराठी कविता
उन्हं पावसाचा खेळ
अश्या पांगल्या सावल्या
माझा मनाच्या अंगणी
उन्हं इथे डोईवर
तुझ्या नभात चांदणी
तेथे चंद्र लोटलेला
मऊ उशीला टेकून
इथे उतरे हाताशी
उष्मं किरणे अजून
आता बरसेल तिथे
बघ सर ओळखीची
इथे येईल वाहत
हवा भरल्या दवाची
तुझ्या सरीतले थेंब
घे ना ओंजळ भरून
सवे चांदण्याच्या इथे
थोडे दे ना पाठवून
बरसेल ते चांदणे
मग अंगणात येथे
जसे ओंजळीत तुझ्या
थेंब पावसाळी तेथे
तुझा पाऊसही असा
इथे चांदण्यात न्हाला
आहे पाठवला थोडा
सवे घेऊन उन्हाला
Dr. Manasi Sagdeo-Mohril
0