अलक मातृदिन

#अलक

काही मातृदिन असेही…

“आज बोलायचंच नाही! कामही करणार नाही, स्वयंपाकही नाही…नाही स्वयंपाकघरात तर जाणारच नाही मी! घरी सगळेच राहणार, खाणार सगळेच, पसारा सगळेच करणार पण आवरायचा मीच. नास्ता करा, स्वयंपाक करा, जेवण झाल्यावर भांडी घासा, मेला हा कोरोना पण जात नाही. चांगलं मदतीला मावशी होत्या…” ह्या सगळ्या विचारांशी तिची लढाई सुरू होती ती बेडरूम मधल्या रजईत… पण शेवटी घरकाम जिंकलं.. आता काय न् नंतर काय, करायचं मलाच आहे; असं म्हणत ती स्वयंपाकघरात आली तेव्हा नवर्‍याच्या हातात शेवटच घासलेलं भांड होत, गॅस वर गरमागरम चहा अन् हे पाहताच हिच्या गालावर खुलेलेली खळी….

****

परवाचा मदर्स डे कोरा कोराच गेला! ना काही सरप्राईज, ना गिफ्ट, ना फोटो! सोशल मिडीयावर सगळ्यांचे फोटो पाहून पाहून सारखं दाटून येत होतं तिला. सगळ्यांचे ते फोटो, गिफ्ट्स, कार्ड्स सारखे डोळ्यांसमोर येत होते अन् डोळे आणखीनच भरून येत होते!! डोक जड झालं होतं. अन्…. आई गं!! हातावर वाफ आली तशी ती कळवळली.. आवाज ऐकून सगळे धावत आले.. नवर्‍याने हात गार पाण्यात घातला, पोरानी क्रिम लावून दिलं अन् दोन वर्षांची तिची छकुली हातावर फुंकर घालून आईचे डोळे पुसत होती.. पुढचे दोन दिवस तिघांनी तिला एकाही कामाला हात लावू दिला नव्हता.
त्या मदर्स डे पेक्षा तिला ही मदर्स लाईफ सेलिब्रेट करणं जास्त आवडून गेलं..

****

खिडकीतून खोलीच्या एका कोपर्‍यात येणारं चांदणं बघताना तिला आईचे शब्द आठवत होते, तू आई होशील तेंव्हाच कळेल हो तुला आईपण..
पण देवानी तिची कुस काही उजवली नाही. तेंव्हा मात्र आईचं हे वाक्य आणि त्याहीपेक्षा जास्त लोकांच्या नजरा तिला टोचू लागल्या. पण आज तिच्याच आईचं सगळं ती अगदी लहान बाळासारखं करत होती.
दोन वर्षांपूर्वी एका अपघातात स्मृती गेलेली तिची आई आज हिलाच आई म्हणुन हाक मारत होती. एका आईला बाळ आणि एका बाळाला आई भेटली आणि दोघींचही आयुष्य पुन्हा मातृत्वाच्या चांदण्यात न्हाऊन निघालं.

****

लहानपणी मुलांना घरात पसारा केला म्हणून उन्हात उभी करणारी ती, आज मात्र ओले डोळे अन् जड अंत:करणानी पसार्‍यात ठाण मांडून बसली होती. परवाच मातृदिनाकरता मुलांनी – नातवांनी तिची खोली सजवली होती. सुनेने सुंदर साडी आणली, मुलगी – जावयाने सुंदर फुले आणि केक पाठवला आणि तिच्या मुलानी अख्खा घराची साफसूफ केली, आईला घर अस्वच्छ आवडत नाही हे पक्क ठाऊक होत त्याला.. मातृदिन झाला, सगळे आपापल्या घरी गेल्यावर मात्र तिला ते स्वच्छ घर नकोस झालं होतं. आता तिला तो पसारा हवा होता आणि तो करणारी मुलंही..
****

©️2021bhavagarbha
डाॅ. मानसी सगदेव मोहरील

error: Content is protected !!