सामाजिक
राकट देशा कणखर देशा

राकट देशा कणखर देशा

एखाद्या वेळी घरी अचानक पाहुणे येतात. रविवारचा दिवस असतो, आईची तरिही घाई सुरू असते, बाबांचा पेपर, मुलांचं रेंगाळणं, आजी – आजोबा आपल्या दैनंदिन कामकाजात मग्न. तेव्हढ्यात अचानक पाहुण्यांचा फोन, “आहात ना घरी, जवळपासच आलो होतो, पाच मिनिटात पोहचू”
झालं, तारांबळ…. “घरात आज वाण सामान येणार होतं, तसं थोडं आहे भरलेलं; स्वच्छता?? अरे देवा, आज जाळी काढायचं ठरवलं होतं, न्हाणीघराची साफ सफाई, स्वयंपाकघर? आलेत तर परत लवकर जायचे नाही असे हे पाहुणे.” आणि ते आलेच…
तरिही आपण तयार..हातात पाण्याचा ट्रे, चहाच आदण गॅस वर.
घरातला प्रत्येक जण काहीतरी कामात व्यस्त. सगळ्यात जास्त चैन ज्यांची ते पोरं, त्यांनाही लावलं कामाला! खरं तर सगळ्यात जास्त पसारा त्यांचाच. आई ओरडत होती, आवारा रे, पण नाही. बाबा म्हणाले आवरू गं नंतर, त्यांच्याच अंगावर बेतलंय, कारण आता बैठकीत त्यांनाच बसायला जागा नाही. आजी – आजोबांच्या वेळा खोळंबल्या, चहा, नास्ता!! आणि आई, तिची काहीही चूक नसताना, (म्हणजे होती खरं, आज जरा उशीराच जाग आली, असं तिचं मत!! ) तिला आता बाजी मारून न्यायची होती.
दमछाक… तो काय टोटल केऑस का काय ते हेच..
आणि पाहुणे,  ते बसलेत आरामात, उणी दूणी काढत, घराला नावे ठेवत, बाबाच्या आर्थिक मॅनेजमेंट बद्दल टोमणे मारत, आईच्या स्वच्छतेबाबत बोलतं, मुलांच्या भित्तीचित्रांवर चर्चा करत आणि अजून एका चहाची फर्माईश सोडत!!
“ह्यांना काय लागतंय, घरात दूध कुठंय?” मग गुपचूप पोराला पाठवायचं नाक्यावर दूध, बिस्किटं,कोथिंबीर जे हवं नको ते मागवायचं. इलेवंथ आवर मॅनेजमेंट!!
मग मधेच पोरांचे नखरे! पाठीवर एक धपटा… पोरगं लागलं कामाला..
एकूणच काय तर आरामाच्या दिवशी दमछाक… एक दिवस जरा रेंगाळल्या मुळे.. ? एक दिवस ?? छी….
असंच काहीतरी झालंय का?? असंच चाललंय खरं तर..
सध्या कोरोनामुळे देशाची अवस्था बिकट झालेली आहे, त्यात महाराष्ट्राची सुद्धा. एका आगंतुकामुळे आत, अगदी खोलवर लागलेली वाळवी उघडकीस आली, त्यानंतर सामान्य जनतेचेच काय, अगदी सर्व पातळ्यांवरील जनतेचे जे हाल झालेत, ते आपण बघतोय. पण ह्यातून आपल्याच आनंदात मग्न असलेले खाडकन जागे झाले. जरा हातपाय हलवायला लागले..
पण राजकारण्यांव्यतिरिक्त बोलायचं झालं तर जी अत्यावश्यक सेवेची फळी होती ती मात्र सज्ज झाली!!कारण आता जनतेला (वरच्या गोष्टीतल्या आईसारखीच) बाजी मारून न्यायची होती. पण सगळ्यात महत्वाचं, ही जनताच एकमेकांच्या मदतीला धावून आलेली आहे. कुठे बेड हवाय, कुठे ऑक्सिजन, कुठे औषधं, आपल्यातलेच काही अगदी स्वतःचा विचार न करता दुसर्‍याच्या मदतीला धावताहेत.
अगदी कधीही, दिवसाच्या कुठल्याही वेळी! त्यात माझे अनेक मित्र मैत्रीणी आहेत, भाऊ आहेत, इतर नातेवाईक, अनेक डॉक्टर वर्ग मित्र आहेत! आता ह्या परिस्थितीत अनेक नकारात्मक गोष्टींमधे ही एक सकारात्मक गोष्ट नक्कीच घडतेय. सामान्य माणूसच सामान्य माणसाकरता धावून येतोय. त्यातल्या कित्येकांनी आपली माणसं गमवली आहेत, पण तरीही मन घट्ट करुन ते अजूनही ह्या युद्ध भूमीवर उभे आहेत, लढत आहेत. अश्या लोकांमुळेच बनतो महाराष्ट्र माझा!! हीच माझ्या महाराष्ट्राची खरी ओळख. हीच महाराष्ट्राच्या मातीची खरी ताकद..
मराठी माणूस कणखर आहेच, अनेक संकटातून बाहेर पडत तो पुन्हा ताठ मानेने उभा राहण्यास सक्षम आहे. ही लढावू वृत्ती ह्या मातीत आहेच आणि ह्या मातीत जन्म घेणाऱ्या प्रत्येक माणसाच्या रक्तातही..
ह्या कणखरपणाचाच हा जल्लोष… एका गोष्टीची खात्री आहे, माझा महाराष्ट्र एकत्रितपणे ह्या संकटाला परतवून लावेल आणि पुन्हा उभा राहिलं, पूर्वीसारखाच, ताठ मानेनी! महाराष्ट्र दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!!

error: Content is protected !!