पेरेंट्स डे!
आजचं गूगल डुडल.. तसं तर आज साऊथ कोरियाचा पेरेंट्स डे.. पण सध्या अख्खा जगाकरता रोजच पेरेंट्स डे! आई वडिलांसाठीचे सगळेच खास दिवस!!
पण हे असे दिवस खरंच खूप आवश्यक असतात. सगळ्या आई बाबांच्या मेहनतीला साजरा करण्यासाठी ह्या दिवसाची गरज आहे, खरंच आहे.. हे आता स्वतः त्या भूमिकेत गेल्यावर कळतं. खरं तर काळ बदलला तसे पालकत्वाचे संदर्भही बदलले. आधी आजी आजोबा, इतर नातेवाईक सतत आजूबाजूला असायचे. त्यामुळे घरातच इतकी माणसं असायची की एकट्या आईबाबांवर सगळी जबाबदारी येत नव्हती. अगदी चौकोनी कुटुंब असलं तरी माणसंही होतीच. चार चौघात कसं मिसळून राहायचं, समाजाकडून काय घ्यायचं काय नाही हे आई बाबा सांगायचे. पण सध्या, मागच्या वर्षांत ही परिस्थिती पूर्णतः बदलली आहे. लोकडाऊन मुळे म्हणा किंवा इतर बऱ्याच कारणांमुळे मुलं घरात आहेत. आई बाबांवर कामाचा ताण आणि मुलांकडे पूर्ण लक्ष देणं अश्या दुहेरी जबाबदाऱ्या आहेत. कालच पंकज सरांसोबत माझा सद्य परिस्थितीला लहान मुलांबद्दलचा विचार बोलून दाखवला. मुलांच्या मनावर होणाऱ्या परिणामांबद्दलची ही चर्चा. तेव्हा सहज एक केस आठवली.एक पेशंट होती, आठ वर्षांची मुलगी, घरी दोघेही आई वडील कामात व्यस्त, इथे आजीआजोबा फक्त फोनवर दिसणार, मग मुलांना कसं रमवायचं तर फोन किंवा टि.व्ही. त्यात शाळाही ऑनलाईन. पण आता हिला फोनची अतिशय सवय लागलेली. घरात माणसं आली की फोन घेऊन आपल्या खोलीत जाऊन बसणार, कुठेही तो फोन सोबत. एक दिवस पहाटे उठली तेंव्हा डोळे सुजले होते, दुखत होते म्हणून आई नी मला कळवलं, तेंव्हा औषध देऊन हा त्रास तर कमी झाला. पण नंतरच्या अपॉइंटमेंट मध्ये मी स्वतः तिला स्क्रीन टाइम बद्दल विचारला. तेंव्हा ती म्हणाली की “this world is so amazing! I can get whatever I want here. Even mom and dad spend a lot of time. They like it.” खरंच, हे साधन मस्तच आहे. पण त्याला बंधन घालायला विसरतो आपण. कुठलीही गोष्ट प्रमाणातच बरी. पण होतं काय, मुलांना रमवायला स्क्रीन देऊन त्यांची वाचनाची, लिखाणाची, माणसांना भेटण्याची संधी आपण हिरावून घेतोय का? सध्या कोरोनामुळे बाहेर माणसांना भेटू शकत नाही, पण आपण घरातली माणसं, ती सुद्धा मुलांपासून दुरावल्या जात आहोत का? ही स्क्रीन माणसांना रिप्लेस करतेय का? असे अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत आणि असं होऊ नये म्हणून पालक खरोखरच प्रयत्न करत आहेत. मुलांकरता हा काळ खूप कठीण आहे, शाळा नाहीत, मित्रांना भेटणं नाही, सोबत खेळणं नाही, एकमेकांकडे जायचं तर दहा वेळा विचार करावा लागतो. इथे नेदरलँड्स मधे शाळा जरी सुरू असल्या तरी साध्या सर्दी खोकल्याचं बंधन आहे. पूर्वी, नाकं गळत असली तरी डे केअर – शाळा न बुडणारे आता साधा एकदा खोकलंलं पोरगं तर म्हणतात बर नाही वाटत तो पर्यंत घरीच राहा. ह्याचा मुलांवर खूप परिणाम होतोय. त्यामुळे त्यांच्या सगळ्या समस्यांकरता हे आई – बाबाच एकमेव उत्तर आहेत.. आणि हे जिकरीचं काम ते खूप छान पद्धतीनी करत आहेत. ज्यांना नाही जमलं ते तज्ञांची मदत घेत आहेत. आमच्या आई वडीलांनी आम्हाला जगाची ओळख करून दिली आणि आम्ही जगाला स्वतःची ओळख कशी करुन द्यावी ह्याकरता आम्हाला तयार केलं, समर्थ बनवलं.. आता जेव्हा हे जग पुन्हा सगळ्यांकरता खुलं होईल तेव्हा ह्या नव्या पिढीला, ह्या बदलांसकट सगळ स्विकारण्यासाठी तयार करायचं आहे…ती मोठी जबाबदारी पालकांवर आहे.आणि खरं सांगते, मुलं ह्याकरता पालकांवर खूप अवलंबून असतात, ते पालकांच अनुकरणच करत असतात. काही दिवसांपूर्वीच वेदात्मनच्या खेळण्यात एक आई आणि मुलगा अश्या दोन बाहुल्या आहेत, त्यातली आई दिसत नव्हती तर मी त्याला सहज विचारलं अरे आई कुठेय, तर मला म्हणाला, संध्याकाळी ती देवाजवळ बसलीये, दिवा लावायला!! ह्या मुलांच सगळीकडे बारीक लक्ष असतं, आई बाबा काय करतात, काय बोलतात हे सतत सगळ बघत असतात आणि तेच ते करतात. तेंव्हा उद्या जाऊन जर तुमचा मुलगा काही उद्धटपणे तुमच्याशी बोललला तर आठवून बघा तुमच्या तोंडून हे उद्गार कधी निघालेत का?? मला नेहमी वाटतं, प्रत्येक जोडीकडे एक मातीचा मऊ – गुबगुबीत गोळा देवानी दिलाय, योग्य वेळी योग्य तिथे हात फिरवा, आकार तो स्वतःच धरेल आणि तुमची प्रतिकृतीच तुमच्या समोर उभी राहील….. सगळ्या पालकांना खूप खूप शुभेच्छा!!
डाॅ. मानसी सगदेव – मोहरील
©️2021bhavagarbha
#GoogleDoodle