पैलतीरावर
गुंता

गुंता

कधी तरी एखादा गुंता नकोश्या नात्यांचाही बांधल्या जातो. नको असतं ते रखडणं तरी सोडवत नाही. एखाद्या रुक्ष दोऱ्याचं कसं होतं; ताणला की गाठं आणखीनच जास्त घट्ट होत जाते, रुतायला लागते, पिळ पडतो, पण सुटतही नाही आणि तुटतही नाही. कात्री घेऊन सोडवायचं तरी गाठ सुटणारी नसते.  बारीक गाठ, घट्ट बसलेली असते नेहमी करता… दोरा कापला तर उरलेला दोरा, कितीही का असेना उपयोगात येत नाहीच. बरेचदा वायाच जातो. नाही तर मग मागची शिवण थोपवून धरते गाठीला पण तसही तो उरलेला दोरा ओझंच असतो….आत असला की रुततो अन् बाहेर असला तर खुपतो..
बरेच जण हे रुतणं निवडतात.. पण कालांतरानी रुतणं आणि खुपणं दोन्हीही नशिबी येतात. मग वाढतो कलह… स्वतःचाच स्वतःशी.. राग ही स्वतःचाच स्वतःवर असतो.. आणि निघतोही स्वतःवरच..
पण काही जणांमधे असतं कसब ह्या अडणाऱ्या गाठीला अलगद सोडवण्याचं.. किंवा नाहीच सुटली गाठ तर तिला झाकून ठेवण्याचं. कुठे तरी आत.. तिला तिचं एक वेगळं स्थान देऊन आयुष्याचा भाग बनवण्याचं.. आणि मग कधीतरीच, अगदी कधीतरीच.. तिच्याशी संवाद साधण्याच.. कसब असतं..
हवंच असं कसब… कारण गुंता तर होणारच.. गाठी पडणारच.. काही हव्याश्या, काही नकोश्या.. काही अलगद सुटतील;  पडलेला पिळही जाईल यथावकाश.. पण काही अश्याही असतील.. न सुटणाऱ्या.. हट्टी.. त्रासदायक.. पण मग नाहीच सुटल्या त्या म्हणून बाकीचा उपयोगी अन् चांगला दोरा का वाया घालवायचा.. गाठींसकट सुंदर बनवून टिकवून ठेवायचा. मिरवायचा.. अभिमानानी… तुमचाच अंश आहे तो.. तुमच्या मनाचा कुठेतरी गुंतलेला एक हिस्सा..  कधी तरी तुम्हीच जगलेला एक क्षण.. जपून ठेवायचा…. काचलेल्या प्रत्येक पिळासकट…. हसून सजवायचा….
पण पुन्हा न जगण्या साठी.. पुढे येतीलच ना नवा गुंता, नवा दोरा..
रेशमीच निवडूया.. प्रयत्न करू…

फोटो साभार गूगल

error: Content is protected !!