पैलतीरावर
क्षण

क्षण

तल्लीन होता आलं पाहिजे
दंग होता आलं पाहिजे
एकरुप होता आलं पाहिजे
कशाशी तरी…
आपण असतोच आपल्यासाठी…. पण एकटे मात्र कधीच नसतो.. सतत काही तरी मागे पुढे असतं आपल्या… मग मागच्या आठवणीत अन् समोरच्या आशेत झुरत बसतो आपण.. काही चुकलेलं, सुटलेलं पूर्ण करायच्या नादात उद्याचं सगळं ठरवतो… कालच्या विचारानी उद्याचं ठरवायचा नादच लागून जातो.. अन् ह्या नादात आहे त्याच्याशी एकरुप व्हायचं राहून जातं…
एखादं गाणं ऐकताना, त्याच्या शब्दा – शब्दाला कानात शिरू देतो आपण.. तसं नाही केलं तरी ते उतरतच नाही मनात.. असंच प्रत्येक क्षणाला मनात उतरवता यायला हवं..
तल्लीन होऊन एखादा क्षण अगदी पूर्ण जगून घेता यायला हवा…
पहिल्या पावसात मोगरा कसा चिंब भिजतो.. तसं .. अगदी आतबाहेर… इतका भिजतो की त्यातून ओघळणारा प्रत्येक थेंब त्या मोगर्‍याचा गंध घेऊनच निथळतो.. आणि मग त्या थेंबासोबत तो गंध मातीशी एकरुप होतो..
अगदी तसंच व्हायला हवं आहे त्या क्षणाचं…. आपण जगलेला प्रत्येक क्षण आपली छाप घेऊनच पुढे सरकायला हवा.. त्या आलेल्या प्रत्येक क्षणावर आपला गंध उतरायला हवा, आपला स्पर्श रुळायला हवा.. तेंव्हा खरं आपण जगलोय तो क्षण असं म्हणता येईल…. आणि तो क्षणही जगेल आपल्याला… समृद्ध होऊ दोघंही मग … खूप..

error: Content is protected !!