#societyenough
#MeToo, काही दिवसांपूर्वी एका मुलींनी आपल्यासोबत झालेल्या लैंगिग छळाला वाचा फोडताना #MeToo ह्या शब्दांचा वापर केला आणि सगळ्या मुलींना स्त्रियांना आवाहन केले की आपल्या सोबत होणाऱ्या ह्या अन्यायाविरुद्ध उभ्या राहा, बोला, मोकळेपणानी बोला, सहन करू नका. तिच्या ह्या आवाहनाला प्रतिसाद देत असंख्य स्त्रियांनी, मुलींनी आपल्या सोशल मीडिया वर #MeToo लिहून कुठे तरी होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडली. काहींनी तो अनुभव व्यक्त केला, काहींनी हिम्मतीने कसं तोंड दिल त्या प्रसंगाला ह्याबद्दल सांगितलं, काहींनी फक्त #MeToo लिहून आपलं दुःख व्यक्त केलं, पण त्या सगळ्याजणी बोलल्या. मन काहीक्षण भरून आलं पण नंतर मात्र हलकं वाटू लागलं. सोशल मीडिया वर एकच वादळ उठलं आणि ते कालांतरानी शांतही झालं. मग जस्टिन बालदोनी नावाच्या युवकाने एक व्हिडीओ शेअर करून सगळ्या पुरुषांना आवाहन केलं कि का स्त्रियांना #MeToo चा वापर करावा लागतो? का पुरुष इतका असंवेदनशील आहे कि त्याला आपल्या आयुष्यातल्या स्रियांना मान देता येऊ नये? का त्याने नेहमीच सशक्त बनून राहावं? आपल्यातल्या संवेदनांना, आपल्या भावनांना का त्याने आत दाबून ठेवावं? आणि मग त्याने #manenough नावाचं एक नवीन वादळ सोशल मीडिया वर आणल.
पण खरंच स्त्रियांविरुद्धचे अत्याचार हे फक्त माणसांमुळेच होतात? एखाद्या स्त्री किंवा पुरुषाला जो अत्याचार सहन करावा लागतो तो फक्त आणि फक्त एखाद्या व्यक्तीमुळेच? नाही! हा अत्याचार समाजाने केलेला आहे. आज आपण #MeToo बद्दल बोलतांना आपला आवाज चोरल्या जातो, आपण मोकळे पणाने आपल्या आई – वडिलांशी, आपल्या प्रियकराशी , आपल्या नवऱ्याशी, आपल्या भावंडांशी, मित्र – मैत्रिणींशी ह्या विषयी बोलू शकत नाही; का? काय कारण आहे ह्यामागे? माझ्या मते ते कारण आहे समाजाची मानसिकता! आज समाजात #victim हाच चर्चेचा विषय असतो. एखाद्या मुलींनी आपल्याशी होणाऱ्या लैंगिक छळाला जगासमोर आणलं तर तिच्याबद्दलच समाज चर्चा करतो. मग तीच मागील काळातलं वागणं, राहणं, तिचा पेहराव ह्या सगळ्याचा उद्धार होतो, आई वडिलांचा उद्धार होतो आणि मग “आमच्या मुलींनी आम्हाला लाज आणली” म्हणून परत दोष तिलाच देतात. अर्थात ह्यालाही अपवाद आहेत, नाही असं नाही. पण आपल्यापैकी किती जणांनी आपल्या पाल्ल्याशी ह्याविषयी मोकळी चर्चा केली आहे? त्यांना धीर दिला आहे कि ‘तुम्हाला कधीही काहीही वाटलं तरी आम्ही सदैव तुमचेच आहोत, पहिला विश्वास आम्ही तुमच्याच बोलण्यावर ठेवू.’ एखाद्या मित्राने किंवा मैत्रिणीने कधी असा विश्वास आपल्या मैत्रिणीला – मित्राला दिला आहे की आम्ही तुझ्या सोबत आहोत, आणि त्या मित्रांच्या पालकांनीही ह्यात साथ दिली आहे? असं सहसा होत नाही. “तू कशाला तिच्या/त्याच्या भानगडीत पडतो?’, “सॉरी, ह्याबाबत मी काहीही मदत करू शकत नाही’ अशी उत्तर जास्त ऐकायला मिळतात.
काही दिवसांपूर्वी अमरावतीत, ज्या शहरात मी लहानाची मोठी झाली , अनेक चांगले – वाईट अनुभव घेतले, त्या माझ्या शहरात दोन भयंकर, हृदयद्रावक घटना घडल्या. एका घटनेत एका मुलीची निघृण हत्या करण्यात आली तर दुसऱ्या घटनेत नववीतील एका शाळकरी मुलीच्या अंगावर ऍसिड फेकण्यात आले. दोन्हीही घटना एक तर्फी प्रेमातून घडलेल्या. आता ह्या घटना घडल्या, तो काही एका दिवसाचा परिणाम नव्हे. ह्या दोघींनीही कित्येक दिवस हे सगळं सहन केलं असेल आणि जेंव्हा आवाज उठवला तेंव्हा त्यांचा हा परिणाम झाला. विकृत मनस्थितीतून घडून आलेल्या ह्या दोन्ही घटनांकरता लोकांनी सरसकट सरकार आणि पोलीस प्रशासनाला जवाबदार ठरवले. अहो, पण समाजाचं सुद्धा ह्यात तितकाच योगदान आहे. आज कुणीच का कुणावर भरवसा ठेवू शकत नाही? आज कुठलीच मुलगी का एखाद्या मुलाकडे मित्र म्हणून बघू शकत नाही?
#MeToo फक्त तेंव्हाच होत नाही जेंव्हा एखादा मुलगा, एखादा पुरुष स्त्रीच लैंगिक शोषण करतो, #MeToo तेंव्हाच होत नाही जेंव्हा एखाद्या स्त्रीचा बलात्कार होतो. हे तेंव्हाही होत जेंव्हा एखादा मुलगी मनसोक्त जगू पाहते आणि लोक तिचा गैरफायदा घेतात, #MeToo तेंव्हाही होत जेंव्हा एखादी मुलगी तुमच्याशी अगदी मोकळेपणानी वागत असेल तर तिला तुम्ही ‘Available’ आहे असं समजता आणि तिच्या अब्रूचे धिंडवडे उडवता, #MeToo तेंव्हाही होत जेंव्हा तुमच्या शेजारची एखाद्या मुलीच्या ग्रुप मध्ये काही चांगले मुलं तिचे मित्र असतात आणि तुम्ही सरळ तिच्या चारित्र्यावर बोट ठेवता. #MeToo तेंव्हाही होतो जेंव्हा तुम्ही तुमच्या मुलीला तिच्या मनसोक्त जगण्याच्या अधिकारापासून दूर ठेवून तिला बंधनात अडकवता.#MeToo तेंव्हाही होतो जेंव्हा तुम्ही तुमच्या गर्लफ्रेंडच्या मनाविरुद्ध तिच्याशि शारीरिक संबंध ठेऊ पाहता आणि तिनी प्रतिकार केल्यावर तिलाच चरित्रहीन ठरवता किंवा तिच्यावर रागावता. वैवाहिक आयुष्यातील बलात्कार म्हणजे सुद्धा #MeToo. तुमच्या नात्यातील, शेजारच्या मुलीवर, त्याच्या बद्दल काहीही ठाऊक नसतांना, संशय घेणे, तिच्या चारित्र्याबद्दल समाजात चर्चा करणे, तिची खिल्ली उडवणे म्हणजे सुद्धा #MeToo. आपल्या इगो जपण्यासाठी आपल्याजवळच्या व्यक्तीला त्रास देणे आणि तो त्रास सहन करत राहणे म्हणजे सुद्धा #MeToo. जेंव्हा एखादी व्यक्ती साधं आपलं मन सुद्धा मोकळं करू शकत नाही, आपल्यावर होणाऱ्या अत्याचाराला, अन्यायाला जगासमोर आणू शकत नाही, जेंव्हा तिला सतत बदनामीची भीती वाटते, तेंव्हाच #MeToo चा जन्म होतो. मग ह्या अश्या परिस्थितीत #manenough पण उपयोगी पडेल असं वाटत नाही.
अश्यावेळी समाजातील प्रत्येकाला आपले डोळे उघडं आवश्यक आहे. जेंव्हा तुम्ही एखाद्याची बदनामी करता, तुम्ही एखाद्याला छळता तेंव्हा त्या व्यक्तीच्या संपूर्ण घरावर ह्याचा परिणाम होतो. विचार करता त्या जागी तुमची मुलगी किंवा मुलगा असेल तर? #MeToo हा समाजातील तुमच्या सारख्या लोकांमुळेच होतो. सध्या वेबसेरीज जाळ खूप पसरलं आहे. अश्यात सिरीज मध्ये लिव्ह – इन रिलेशनशिप मध्ये असणार एक जोडपं दाखवतात, त्यांच्या पूर्वीच्या प्रकारणांबद्दल ते एकमेकांशी मोकळेपणाने बोलत असतात, क्लब, पार्टीज मध्ये मोकळेपणाने वावरणे, लहान लहान कपडे घालणे आणि लग्नापूर्वीचे संबंध असा काहीसा त्या मुव्हीजचा प्लॉट असतो. त्या तुम्हाला खूप आवडतात. त्या मालिकांमधली ती फ्री, स्वावलंबी मुलगी तुम्हाला हवीहवीशी वाटते. तुम्ही त्या मालिकांना त्या लघुचित्रपटांना खूप भरभरून प्रेम देता. पण जर अशीच एखादी मुलगी किंवा असाच एखाद लिव्ह – इन मध्ये राहणार जोडपं तुमच्या आजूबाजूला असेल तर? त्यांना सुद्धा तुम्ही तेंव्हढच प्रेम द्याल? त्यांना तुम्ही त्यांचं स्वातंत्र्य द्याल. नाही ते तुम्ही करूच शकत नाही. त्या मुलीचं जगणं कठीण होईल इतकं तुम्ही तिला छळाल. तिच्या नकळत तिच्या बद्दल चर्चा करून, तिच्या वागण्याबद्दल बोलून, तिच्या राहणीमानाबद्दल चर्चा करून, तिच्या स्कर्टच्या लांबी बद्दल चर्चा करून तुम्ही तिचा बलात्कारच कराल. मग #manenough चा खरंच इथे उपयोग आहे?
खरतर आपण #societyenough हा नारा लावायला हवा. प्रत्येकाचं व्यक्ती स्वातंत्र्य त्याला जपण्याचा अधिकार मिळायलाच हवा. त्याला वयाचं किंवा लिंगाच बंधन नसावं. ती मुलगी किंवा मुलगा तुमचं अपत्य आहे त्याप्रमाणे विचार करायला हवा! तेंव्हाच आपला आपल्या जवळच्या – दूरच्या प्रत्येक व्यक्तीवर विश्वास बसेल. तेंव्हाच #societyenough चा खरा अर्थ सध्या करता येईल.