मराठी कविता
हे हसू नेमके ..
रुसून बसते कोषातच अन् कधी लागते डूलाया
हे हसू नेमके वसंतात बघ कसे लागते फुलाया
तू बहरत जाते शुभ्र फुलासम हरवत जातो मीही
मग पानापानांतून घुमणारी लाडिक लाडिक ग्वाही
हा गंध तुझाही धजावला मज गुन्हेगार ठरवाया
हे हसू नेमके वसंतात बघ कसे लागते फुलाया
त्या गोऱ्या रंगावरती रुळते बघ हलकीशी लाली
ती पुरे तेव्हढीच एक छटा जी उठून दिसते गाली
का रंग उधळते पहाट माझे चित्त असे भुलवाया
हे हसू नेमके वसंतात बघ कसे लागते फुलाया
हा खुलून जाई आसमंत अन् रंगीत रंगीत बागा
परी तुझ्याशी मला जोडतो सफेद कोरा धागा
तू अशीच रहावी श्वासांमध्ये क्षण पुढचा जगवाया
हे हसू नेमके वसंतात बघ कसे लागते फुलाया
-मानसी
Dr. Manasi Sagdeo-Mohril
0