स्पर्श
रणरणत्या दुपारी आप्पासाहेब भरभर पावलं टाकत घराबाहेर पडले आणि त्यांनी जवळच्या पोस्ट ऑफिसकडे मोर्चा वळवला. मनात असंख्य विचार… “कुणाचं असेल? मला का बोलवंल? आजकालचे पोस्टमन मेले आळशी झालेत. माझंच पार्सल घ्यायला मला बोलवलं..आणून नाही देता येत घरी? पण रघू काम करायचा तिथे? एवढ्यात कसा रिटायर झाला? का काही अपघात वगैरे?”
आप्पांच्या घराजवळचं एकच पोस्ट ऑफिस. तिथे काम करणारे लोकंही आता ओळखीचे झाले. लहान गाव, त्यामुळे सगळेच ओळखीचे. आणि आप्पा तसे प्रतिष्ठीत व्यक्तीमत्व.. त्यांना पोस्ट ऑफिस मधून फोन आला होता, कसलंस पत्र आलंय आणि सामानही . पण आणून द्यायला माणूस नाही, त्यामुळे तुम्हालाच यावं लागेल. आप्पा जरा वैतागलेच. आता आपल्याच पत्रांकरता पोस्ट ऑफिसला जावं लागणार. आपल्याच तंद्रीत ते पोस्ट ऑफिस मधे गेलेत. “आहे का कोणी?”
गेल्यावर पाहिलं, ऑफिसात दोनच कर्मचारी होते. सगळं काम त्यांच्यावर येऊन पडलेलं स्पष्ट दिसत होतं.
“कोण? आप्पासाहेब?
या या. अहो पत्र येऊन पडलं तुमचं आणि हे पार्सल ही”
तोंडावरचे मास्क सारखा करत एका कर्मचाऱ्याने आप्पांना सामान पिशवीत घालून दिलं आणि सहीसाठी कागद पुढे केला. आप्पांनीही सही केली आणि कागद परत करताना जरा वैतागूनच म्हणाले,” अरे, काय रे? सामान आणून द्यायला कसं कुणी नाही? रघू कुठेय?
कर्मचाऱ्याने मान खाली घालून सांगितले, ” रघू गेला, कोरोना झाला होता म्हणे.”
आप्पासाहेब हळहळले..
” मागच्याच महिन्यात गेला, तेंव्हापासून जागा रिकामी आहे. मी आणि हा गण्या जमेल तसं नेऊन देतो पण आज नाही जमलं त्यामुळे तुम्हाला फोन केला.”
“अरे अरे, त्याचं कुटुंब उघड्यावर पडलं असेल. त्याच्या मुलाला नाही का लावून घेता येणार? आप्पासाहेबांनी विचारलं.
“भरती काढली पण कुणाला आता खाकी कपड्यातला पोस्टमन बनायला नाही आवडत. त्याचा लेकही आता जातो कामावर, कुठली तरी कंपनी आहे. आपले पत्र पोहोचवत नाही, फक्त सामान पोहोचवतो. रंगीत कपडे असतात, गाडी मिळाली मग बापाची काळी दांड्याची सायकल कोण चालवेल? बेरोजगार राहतील, जेवण पोहोचवतील, कुण्या परक्या देशाच्या कंपनीसाठी गावभर हिंडतील पण इतकी वर्ष ज्यानी गरज भागवली त्याच्या करता नाही येणार. तसंही, आता पत्र पाठवणारेही कमीच! कागदावर बोटांचे ठसे उमटलेलं, हातानी घड्या पाडलेलं, पाठवणाऱ्याच्या घरचा वास सुद्धा सोबत घेऊन येणारं पत्र आता आवडेनासं झालं आणि ते पोस्ट ऑफिसही. सरकारी कामाकरता हजार येतील पण आपल्या माणसासाठी कोण येईल?”
एका दमात आपल्या मनातलं सगळं साचलेलं त्या कर्मचाऱ्यानी आप्पासाहेबांसमोर काढलं आणि उसासे टाकत तो निघून गेला..
पण आप्पासाहेब मात्र तिथेच घुटमळले इतकी वर्ष आलेल्या पत्रांच्या आठवणीत!! तेवढ्यात समोरून भरधाव वेगाने ॲमेझाॅनच्या डिलीवरी बाॅयने गाडी पळवली आणि क्षणभर आप्पा पुन्हा विचारात पडले आणि फरक शोधू लागले डिलिवरी बाॅय आणि पोस्टमन ह्या दोघांमधे.. पण उत्तर काही सापडेना. मग व्यथित झालेल्या मनाला त्यांनी पुन्हा रघूच्या आठवणीत गुंतवलं आणि जड पावलांनी घर गाठलं. आले तेंव्हा हातात लेकाच्या घरचा गंध घेऊन आलेलं एक पत्र आणि नातवाच्या हाताचे ठसे होते… आपल्या नातवाचा स्पर्श आपल्यापर्यंत ह्या मार्गानी पोहचल्याचं तेव्हढंच समाधान त्या पाणावलेल्या डोळ्यात होतं…