सामाजिक
समतोल..

समतोल..

नुकतंच डेसिग्नेटेड सर्वायव्हर हा अमेरिकन टिव्ही शो पाहिला. त्यातलं एक जोडपं आणि त्याची कथा मनात अजूनही घोळतेय.  ॲरन आणि इसाबेल, मेक्सिकन, दोघेही व्हाईट हाऊस मध्ये काम करत असतात. ॲरन हा प्रेसिडेंटच्या अगदी जवळचा, विश्वासातला माणूस, त्याचा नॅशनल सिक्योरिटी हेड आणि इसाबेल तेथेच एका पदावर काम करतेय. ॲरन अत्यंत हुशार, देखणा आणि महत्त्वाकांक्षी तर इसाबेल साधी, सरळ, स्पष्टवक्ती, मेहनती आणि कामाशी आणि स्वतःशीसुद्धा प्रामाणिक. व्ययक्तिक आयुष्यात दोघांचं एकमेकांवर जिवापाड प्रेम असतं आणि म्हणूनच ते दोघे सोबत राहयचा निर्णय घेतात. अश्यातच ॲरनला व्हाईस प्रेसिडेंट पदाकरता विचारण्यात येतं आणि ह्या दोघांच्या आयुष्याला कलाटणी मिळते. ॲरन हा मेक्सिकन आणि मेक्सिकन मुलीशीच लग्न करणार ही गोष्ट पोलिटिकल अजेंडा म्हणून जरा पचनी पडणारी नसते, त्यामुळे इसाबेलच्या व्ययक्तिक आयुष्यावर आणि काम करण्याच्या पद्धतीवर फरक पडणार हे स्पष्ट दिसत असतं. पण ॲरनला साथ द्यायची म्हणून ती हे ही स्विकरते. पण तिच्याकरता असे लोक जास्त महत्वाचे असतात ज्यांच्यावर अमेरिकेत अन्याय होत आहे आणि ती ही गोष्ट प्रेसिडेंटच्या मदतीने कशी सोडवता येईल आणि प्रेसिडेंटच्या कॅम्पेनला त्याचा किती फायदा होईल ह्याकरता प्रयत्नशील असते. पण आता ॲरनच्या लेखी मात्र तिचं काम तितकसं महत्वाचं नसतं, त्यामुळे प्रचाराकरता तिने सोबत यावं असं त्याला वाटतं. आणि एका वेळी त्याच्या तोंडून हे निघतंच की त्याची व्हाईस प्रेसिडेंसी ही इसाबेलच्या कामा पेक्षा महत्वाची आहे, श्रेष्ठ आहे. शिवाय बरेचदा त्याच्या बोलण्यातून तिच्या क्षमतेवर त्याला असलेली शंका स्पष्टपणे तिला दिसून येते. आपल्या खरेपणाला कुठेही कमी पडू द्यायची इच्छा नसलेली इसाबेल मात्र आपलं काम चोख पार पाडत असते. पण ह्यामुळेच त्यांच्या नात्यात कटूता निर्माण होतेय हेही कुठेतरी तिला कळत असतं, दिसत असतं. ती आटोकाट प्रयत्न करते, पण मध्यंतरी अशा काही गोष्टी घडतात की ते वेगळे होतात. ॲरनची तशी इच्छा नसते पण ती मात्र आत्मसन्मानासाठी ह्या नात्यातून बाहेर पडायचा निर्णय घेते. तरिही प्रचाराकरिता त्याची मदत करतेच. त्यावेळी ॲरनला देखील हे जाणवतं की आपल्या चुकीमुळे आपण एक चांगला जोडीदार गमवलाय, तो व्हाईस प्रेसिडेंट झाल्यावर तिला पुन्हा एकत्र येण्या बद्दल विचारतो पण ती म्हणते की “तुझ्यासाठी जर मला, मी आहे तशी स्विकारणंच जमत नसेल, माझ्या क्षमतांवर शंका घेऊन जर तू मला कमीच लेखणार असशील तर अश्या नात्याला काहीच अर्थ नाही. तू माझ्या कामाचा कधीच गांभीर्याने विचार केला नाही. मला कधीच बरोबरीचं स्थान दिलं नाहीस”खरं तर अश्या अनेक इसाबेल आपल्यात वावरत असतात, ज्या अतिशय कर्तबगार असतात, हुशार असतात पण त्यांच्या हुशारीला घरीच किम्मत नसते, त्याच्यातल्या गुणांबद्दल कुणीच गांभीर्यपूर्वक विचार करत नाही, त्यांना प्रोत्साहन देत नाही, त्यांचे कौतूक करत नाहीत. ह्या इसाबेलला, त्या नात्यातून बाहेर पडणं शक्य झालं, एकदा त्रास झाला, पण पुढे मात्र ती तिच्या कामामुळे ओळखली जाईल, असं काहीतरी करेल की तिला त्यात आनंद मिळेल. पण बर्‍याच मुली अश्या असतात की ज्या अश्या नात्यातून बाहेर न पडता, असच कुढत आयुष्य जगतात. झोया अख्तरच्या दिल धडकने दो मधल्या प्रियंका चोप्रा सारख्या, त्यात आएशा (प्रियंका) अतिशय हुशार व्यावसायिक असते. मित्रांमध्ये रंगलेल्या स्त्री पुरुष समानतेच्या एका चर्चेत आएशाचा नवरा म्हणतो, आमच्या सात पिढ्यात कुठल्याही स्त्रीने काम केलं नव्हतं, पण मी आएशाला परवानगी दिली काम करण्याची.. तेव्हा फरहान अख्तरचं प्रत्युत्तर अगदी सणसणीत वाटतं, ‘ तिला का गरज पडली तुझ्या परवानगीची? ती एक स्वतंत्र व्यक्ती आहे, वाटेल ते करेल.’ खरंय!! एका व्यक्तीला हे कळायलाच हवं की दुसर्‍याचं आयुष्य हे त्याचं स्वतःच आहे, कुणाच्या मालकीचं नाही. त्याला ज्याच्यात आनंद मिळतो असे काहीतरी त्याने करणेच योग्य (म्हणजे अगदीच कुटूंबांचा समतोल ढळू देऊन नाही, पण उगाच बंधनं नकोत). इथेच खरं तर आपण चुकतो. बरेचदा अस होतं की आपण बर्‍याच गोष्टी गृहीत धरतो. तसेच बर्‍याच लोकांना आणि त्यांच्या कामाला देखील गृहीत धरतो. हे ठरलंय की स्त्रीचं हे काम आणि पुरूषाचं ते, मग कशाला कोण विचारतंय की बाबारे तुझी इच्छा काय? आणि आपणही अगदी लहानपणापासून हेच, कुणीतरी शिकवल्यासारखं आयुष्य जगतो, पण आपल्याला काय वाटतं, हे मात्र विचारतच नाही किंवा कुणी तरी जाणिव करुन द्यायची वाट बघत बसतो. ह्या सगळ्यात आपला अमुल्य वेळ मात्र वाया जातो. बरेचदा हे सगळं कुठेतरी नाॅर्मलच वाटतं, कारण आपण आपल्या आजूबाजूला हेच सगळ बघत असतो. आपल्या घरातील मोठ्यांचं अनुकरणच आपण करत असतो, तोपर्यंत; जोपर्यंत आपण त्या वलयातून बाहेर पडत नाही, जोपर्यंत आपल्याला काय बरोबर काय चूक हे अनुभवातून कळत नाही किंवा असा अन्याय आपल्यासोबत होत नाही. स्त्री – पुरुष समानता हा मुद्दा फक्त सिनेमा, मासिकांतून, नाटकांमधून  ऐकायला – बघायला छान वाटतो पण प्रत्यक्षात तो आचरणात आणला तर खरं.. खरं तर मला वाटतं हा मुद्दाच नाही. समोरच्या व्यक्तीला, मग ते नातं कुठलही असो, नातं असो किंवा नसो, माणूस म्हणून जरी बघता आलं, त्याचं मन जरी जपता आलं तरी पुष्कळ आहे. हा समतोल साधला तरी काफी है!! मग अश्या इसाबेल आणि आएशा आपल्याला दिसणार नाहीत की फेक फेमिनिस्टांचं दुकान चालणार नाही… चलो..  करके देखते है ना यार.. 

error: Content is protected !!