मराठी कविता
लामणदिवा

लामणदिवा

तुझ्या ओसरीवर पसरेल
जरासा सोनेरी प्रकाश,
अन् उजळून जाईल तुझं सारं अवकाश
क्षणात, अगदी एकाच क्षणात
जेव्हा पेटेल वात तिन्हीसांजेला ..
रात्रभर तेवत राहण्यासाठी…
तुझ्याही नकळत..
येणाऱ्या प्रत्येक झुळकेसोबत
फडफडत राहिल ती..
तिचं अस्तित्व दाखवून देण्यासाठी…
जगाला, तुला, तुझ्या ओसरीला
आणि तिच्या त्या लामणदिव्याला..
तू फक्त बघ तिला येता जाता….
थोडं बोल तिच्याशी..
थोडं तुझं सांग थोडं तिचं ऐक..
कधी हाताचा आडोसा दे तिला..
थोडी मायेची उब…
अन् तुझं लख्खं हसू ..
अन् मग बघ.. असंच उजळत राहिल तुझं अंगण.. सदैव..
तुझ्यासाठी… जळत राहिल
ती वात…
सतत, रोज…
तुझी वाट बघत…
तुझ्याच ओसरीवरच्या ह्या लामणदिव्यात..

error: Content is protected !!