प्रवास वर्णन
लँड ऑफ आईस अँड फायर – आइसलँड

लँड ऑफ आईस अँड फायर – आइसलँड

पृथ्वी! पृथ्वी एक रहस्य आहे. ह्या धरणीची रचना करताना त्यात अनेक रंग भरणारा तो कर्ता माझ्या करता नेहमीच एक मोठं रहस्य राहिला आहे. इथे निसर्गकृपेने घडणाऱ्या सगळ्या हालचाली, सगळे बदल आपण  बघत असतो. फिरतं ऋतुचक्र, चंद्राच्या बदलत्या कला, सूर्याचे बदलते कल, वाऱ्याच्या विशिष्ट दिशा, दरीखोऱ्यांमधून वाहणारे, सळसळणारे धबधबे, नद्या,  उत्तरेकडील बर्फाच्छादित पर्वत आणि भुतलातील हालचालींमुळे त्यात होणारे बदल, समुद्राचे कधी रौद्र तर कधी सौम्य रूप, धरणीकंप, ग्रहण अश्या अनेक बदलांमधून ही सृष्टी सतत जात असते. ह्याच सगळ्या गोष्टींचा अभ्यास केला तर आपण आपल्या ह्या पृथ्वीच्या अधिकाधिक प्रेमात पडत जातो आणि हे अभ्यासण्याच्या अनेक मार्गांपैकी एक म्हणजे पर्यटन! एखादी जागा निवडावी आणि त्या जागी भटकून यावं. अगदी अभ्यासासाठीच म्हणून नाही पण पृथीवर वसलेलं, तिनेच जन्म दिलेलं हे सौंदर्य पाहण्यासाठी नक्कीच घराबाहेर, आपल्या कम्फर्ट झोन च्या बाहेर एकदा तरी पाऊल टाकावं. जिथे मनुष्याचा कशावरच ताबा नाही, जिथे तुमच्या श्वासांचं महत्व, तुमच्या जन्माची ओढ तुम्हाला पुन्हा जिवंत करेल, पुन्हा एकदा जगण्यावर प्रेम करायला लावेल अश्या ठिकाणी एकदा तरी मनसोक्त भटकून यावं. एक पाऊल उचललं की मग पुढची पाऊलं आपोआपच हवी ती वाट धरतात. चिखलदऱ्याच्या चिंचोळ्या, नागमोडी वळणावर मी सुद्धा असचं एक पाऊल ठेवलं होतं. खरंतर त्यापूर्वीही खूप फिरलोय आम्ही, भारताच्या अनेक लहान मोठया भागांमध्ये, पण २०१० मध्ये आई – पप्पांसोबत चिखलदऱ्याला गेले असतांना तिथलं भाबडं रूप मनाला वेडं लावून गेलं. नुकत्याच झालेल्या पावसामुळे प्रत्येक झाड खुलून आलं होतं. तिथून खरा हा प्रवास सुरु झाला. त्यात अनेक नवनवीन ठिकाणं येत गेलीतं. तिथला  भौगोलिक, ऐतिहासिक वारसा जाणून घेण्याची ओढ, धडपड अधिकच वाढू लागली. अश्यातच काही वर्षांपूर्वी आइसलँड ह्या देशाबद्दल वाचले. तेथे घडणाऱ्या भौगोलिक प्रक्रियांबद्दल ऐकून मनात खळबळ माजली होती. उत्तर ध्रुवाच्या अगदी जवळ असणारा  हा देश, भौगोलिक रित्या वैशिट्यपूर्ण आहे. आइसलंड हा उत्तर युरोपातील उत्तर अटलांटिक महासागरात वसलेला एक द्वीप-देश आहे. पृथ्वीतील स्तरांच्या लहान मोठ्या हालचालींमुळे आणि भूकंपांमुळे ह्या देशाने आकार घेतला. ह्या देशाचा बहुतांश भाग हा लाव्हारस आणि त्यासोबत त्यातून बाहेर पडलेल्या खडकांमुळे तयार झालेला आहे. ज्वालामुखीचा उद्रेक होतांना त्यासोबत आलेल्या भूगर्भातील असंख्य खडक व लाव्हा ह्यांमुळे आइसलँडच एक आगळं वेगळं रूप नजरेस पडतं. ठिकठिकाणी ह्या खडकांवर आता हिरवंगार मॉस दिसून येतं.. मध्येच कुठेतरी सुपीक जमीन असल्यास काही झाडे सुद्धा आढळतात.

एकी कडे अशी रुक्ष जमीन तरी दुसरीकडे पर्वतांमधून कोसळणारे धबधबे! लहान टेकड्या असू देत किंवा महाकाय पर्वत; प्रत्येक ठिकाणी दुधाळ झरे आपल्याला वाहतांना दिसतात आणि त्यांच्या पायथ्यशी पुन्हा हिरवळ! नाही मोठे धबधबे तर संपूर्ण खडकाळ पहाडांमधून सुद्धा लहानमोठे पाझर फुटलेले आढळून येतात. एकीकडे इतके मुबलक पाणी असतांना ह्यांना काय कमतरता असेल असा विचार येतो न येतो तोच पुन्हा ज्वालामुखीतलं ते खडक आपल्या नजरेस पडतात आणि तेथील रुक्षतेची आपल्याला जाणीव करून देतात. 

दक्षिणेकडील भाग हा आणखी रुक्ष – कोरडा आहे, पण त्याचे कारण म्हणजे ‘गिझर्स’. होय, आपल्या बाथरूममधे गरम पाण्याच्या मशीनला ज्यामुळे नाव पडलं ते Geysers. जमिनीत खोलवर असणारा पाण्याचा स्रोत जेंव्हा जमिनीतील उष्णतेमुळे गरम झालेल्या खडकांच्या संपर्कात येतो, त्या जागी उकळ्या फुटतात. हे गरम पाणी अनेक जीवनसत्व घेऊन बाहेर पडतं. काही ठिकाणी अश्या गरम पाण्याचे तलाव आहेत, तर काही ठिकाणी अगदी लहान डबके. पण भूगर्भातील ह्या क्रियेमुळे आत दबलेल्या उष्णेतीची जाणीव आपल्याला होते. ह्या पाण्यात सल्फरचे प्रमाण जास्त असल्यामुळे आपल्याला पुन्हा एकदा केमेस्ट्री लॅब मध्ये गेल्यासारखे वाटेल.  उत्तर ध्रुवाजवळ असूनही आइसलँडमधील वातावरण उबदार असण्याचे हे सुद्धा एक कारण आहे.

येथील एक आणखी वैशिष्टय म्हणजे थिंगवेथ्लिर (Þingvellir) नॅशनल पार्क. थिंगवेथ्लिर (Þingvellir) येथे नॉर्वेच्या राजापासून स्वत:ची सुटका करू पाहणार्‍या आणि शेती आणि पशुपालनासाठी नव्या जागा शोधणार्‍या वायकिंग लोकांनी ९व्या शतकात प्रवेश केला. इ.स. १२६२ साली नॉर्वेचे राज्य आइसलँड वर सुरू झाले. कालान्तराने नॉर्वेची जागा डेन्मार्कने घेतली आणि डॅनिश सत्तेखाली आइसलंड इ.स. १९४४ सालापर्यंत राहिला. इ.स. १९४४ साली परस्परसंमतीने आइसलंड स्वतंत्र देश झाला. या घटनेची घोषणा थिंगवेथ्लिर (Þingvellir) येथे करण्यात आली होती. ह्या जागेचं महत्व म्हणजे पृथ्वीच्या दोन भिन्न प्रकारच्या स्तरांचे एकाचं ठिकाणी होणारे दर्शन! इथे असलेली ही मोठी भेग, वर्षांगणिक १ – २ सेंटिमीटर्सनी वाढत आहे. इथेही तुम्हाला लाव्हारसामुळे तयार झालेले अनेक अवशेष आढळून येतात आणि समोर पसरला विस्तीर्ण तलाव.

आइसलँड मध्ये साधारणपणे  ३० ज्वालामुखी अजूनही सक्रिय आहेत, पण जुन्या अगदी हजारो वर्षांपूर्वी उद्रेक झालेल्या ज्वालामुखीची आजही येथे चिन्ह दिसून पडतात. काही ठिकाणी क्रेटर्स आपण जाऊन पाहू शकतो, तर काही पहाडांवर चढ अशक्य आहे. त्यातील एका क्रेटरला आम्ही भेट दिली, तो म्हणजे केरिड क्रेटर! आइसलँड मधील अनेक तलावांपैकी हा एक. केरिड येथे ज्वालामुखीचा उद्रेक झाल्यावर आणि त्यातील सर्व लाव्हा व खडक बाहेर पडल्यावर तेथे एक पोकळी निर्माण झाली. ही पोकळी आजूबाजूच्या माती व खडकांच्या वजनाने भरून निघाली व आतील पाण्याचा साठा वर आला. त्यामुळे ह्या पाण्यात सुद्धा बेसाल्ट आणि सिलिका आढळून येतात. हे पाणी स्थिर असूनही शुद्ध आहे.

केरिड सारखेच अनेक शांत असलेले क्रेटर्स आपल्याला रस्त्यातून येता – जाता दिसतात. त्यातील काही बर्फाच्छादित आहेत तर काही उघडे. बर्फाच्छादित पर्वतांच्या पायथ्याशी विशालकाय ग्लेशिअर्स आपल्या स्वागतासाठी सज्ज असतात. त्यांच्या त्या अजस्त्र बाहुंमध्ये सामावल्यावर आपण किती लहान आहोत ह्याची आपल्याला जाणीव होते आणि पुन्हा एकदा ह्या माउलीच्या, ह्या निसर्गाच्या पायावर लोटांगण घालावं अशी तीव्र इच्छा प्रकट होते. ग्लॅशिअर्स मधून उतरणारं पाणी हे समोरच महासागरात जाऊन मिळतं. पण त्यांच्या मध्ये विसावतो तो विस्तीर्ण काळ्या वाळूचा समुद्र! हो! समुद्रच, त्याला किनारा म्हणण्याची चूक मी करणार नाही! ही काळी वाळू बेसाल्ट खडक आणि लाव्हामुळे येथे आहे.

 खळखळणाऱ्या लाटा, उधाणलेला समुद्र आणि त्याच्या त्या आवाजातील सूर ह्यात आपण हरवून जातो. तिथे वाहणाऱ्या वाऱ्यासमोर उभं ठाकणं म्हणजे दिव्यच! समोर विशालकाय पर्वत आणि मागे समुद्र ह्याशिवाय तिथे कुणाचंही काहीच अस्तित्व नाही. त्या पर्वतातून समुद्रात वाहणारी आणखी एक विशिष्ट गोष्ट म्हणजे हिमनग! जोकूलसारलॉन ह्या ग्लेशिअरजवळ असे अनेक हिमनग आपल्या दृष्टीस पडतात. ऐतिहासिक हिमयुगाचे अखेरचे अवशेष अजूनहि आइसलंडमध्ये शिल्लक आहेत. कित्येक वर्षांपासून स्थिरावलेला हा खोल बर्फ अजूनही तिथे अस्तित्वात आहे. पण वाढत्या उष्णतेमुळे अगदी अलीकडे तयार झालेले काही तुकडे समुद्रात वाहत येतात. पण काळ्या वाळूवर पसरलेले हे बर्फाचे तुकडे अगदी हिऱ्यासारखे चमकतात म्हणूनच त्या किनाऱ्याला नावही Diamond beach असा दिलं आहे.

  मागील काहीवर्षांत येथील बर्फ वितळत असल्यामुळे तलावाचा आकार वाढतं चालला आहे. ही नक्कीच एक चिंतेची बाब आहे. पण बदलत्या परिस्थितीमध्ये सुद्धा जोकूलसारलॉन तुम्हाला विस्मित केल्याशिवाय राहणार नाही.ह्याच मार्गावरून जाताना आम्हाला एक विशिष्ट जागा दिसली. जाताना थांबता आला नाही पण येताना आवर्जून त्या जागी आम्ही थांबून त्याबद्दल जाणून घ्यायचा प्रयत्न केला. ती जागा होती एक शेत. १८ व्या शतकात झालेल्या एका ज्वालामुखी उद्रेकामुळे एका शेतकऱ्याचं संपूर्ण शेत नष्ट झालं. पण त्यांनी आस सोडली नाही. तो पुन्हा ते उभारण्याच्या तयारीला लागला. प्रसंग कठीण होता पण त्यांनी हार मानली नाही. त्याची हि जिद्द पाहून लोकांनी त्याला शुभेच्छा देण्याकरता काही दगडं एकावर एक रचून मनोरे उभे केले. लहान लहान असे असंख्य मनोरे आजही त्या जागी उभे आहेत.

२०१० मध्ये पुन्हा एकदा आइसलँड ला एका मोठ्या ज्वालामुखींनी आपल्या कवेत घेतला, तेंव्हा संपूर्ण उत्तर युरोपवर त्याचा धूर अनेक दिवस पसरला होता. पण आइसलँड पुन्हा उभं राहिलं. आइसलँड मधील शासनाने आणि जनतेने त्यांच्या ह्या भौगोलिक वारस्याला जीवापाड जपलं आहे. त्याच्या संवर्धनासाठी ते सतत झटत असतात. एक तर तेथील लोकसंख्या कमी असल्यामुळे आपल्याला फार गर्दी अशी कुठेच दिसत नाही. पर्यंटन स्थळी गर्दी ती पर्यटकांची आणि त्यांचे सारथी म्हणजे टूर्स संस्थांची. तेथील घोड्याची जात जगभरात खूप प्रसिद्ध आहे, ते त्यांच्या मजबूत आणि सौंदर्यपूर्ण शरीरयष्टीमुळे. तसेच ते तेथील गावांत उत्पादनाचा एक पर्याय सुद्धा आहेत.  तसेच तेथील मेंढ्यांचा व्यवसायातील वाटा फार मोठा आहे. मेंढ्यांचे केस तसे तर वापरल्या जातातच, पण इथले व्यापारी पक्षांचा सुद्धा उपयोग ह्या व्यवसायात करतात. पक्ष्यांनी आपल्या अंड्यांच्या उबेकरता घरट्यात जे मेंढीचे केस जमवले असतात ते केस येथील व्यापारी जमा करतात व त्यापासून गरम कपडे, शाली, हातमोजे वगरे बनवतात. तसाच आणखी एक महत्वाचा व्यवसाय म्हणजे मासेमारी. पश्चिम आइसलँड मध्ये मासेमारीचा मोठा व्यवसाय आहे. अर्थात पर्यंटनाचा सुद्धा व्यवसाय वृद्धिंगत होण्यामध्ये मोलाचा वाटा आहे. तसेच येथील भौगोलिक परिस्थितीमुळे सिनेमा पर्यटनाचा व्यवसाय सुद्धा येथे चालतो. हिवाळ्यात ऑरोरा बोरिअलीस म्हणजेच Northern Lights पाहण्यासाठी सुद्धा आइसलँड ही एक महत्वाची जागा आहे. हे आमच्या बकेट लिस्ट मध्ये आहेच! पण सध्यातरी ह्या ५ दिवसांच्या प्रवासातच आम्ही हरवून गेलोय!! One of the best gifts by mother nature! इसे छुओ मत बस नज़र में भरलो!!

error: Content is protected !!