मराठी कविता
खिडकीतली सर
गच्च डोळे मिटून
मनाची दारं सताड
उघडी ठेवून
दोन्ही हातांची ओंजळ
ठेवून दे आकाशाखाली..
आभाळ भरून आलं की
भरेल ओंजळही
कानावर कोसळतील
काही आवाज
अन् पापण्यांवर स्वार होतील
काही थेंब,
त्यांना जगून घे
त्याच क्षणी …
मनात घर करतील ते
अन् वाहू लागतील,
ओघळू लागतील
अगदी आत आत…
अन् मग तुझ्या गंधात
न्हाऊन निघतील…
पुन्हा नव्याने बरसण्यासाठी
तुझ्या खिडकीतली सर
अशीच कोसळत राहते
चिंब भिजण्यासाठी..
Dr. Manasi Sagdeo-Mohril
0