मराठी लेख
कालनिर्णय

कालनिर्णय

कालनिर्णयच्या मागंच पान…..

भिंतीवरी कालनिर्णय असावे…..!!
मला वाटतं कळायला लागल्यापासून किंवा अगदी त्याही आधी, अगदी आईच्या पोटात असताना कानावर पडणाऱ्या अनेक नावांपैकी एक म्हणजे कालनिर्णय!! आपली नाळ जितकी आपल्या संस्कृतीशी जोडली आहे तितकीच त्या संस्कृतीच्या प्रत्येक प्रतिकाशी जोडल्या गेली आहे. त्यातलंच एक म्हणजे कालनिर्णय! आता लिहिताना, म्हणजे टाईप करताना बघतेय तर ‘काल’ टाईप केल्यावर लगेच ‘कालनिर्णय’ सजेशन्स मध्ये येतंय, अगदी असच हे कालनिर्णय आपल्या मनात काहीही आलं तरी योग्य ते, हवी ती माहिती दाखवायला आपल्या समोर असतं. दैनंदिन जीवनात हवी ती मदत तर होतेच, सणवारं, महत्वाच्या तिथी, अगदी बारीकसारीक तपशील सुद्धा त्या – त्या तारखेच्या रकान्यात सापडतात.  एखाद्या वेळी काही बघायचं असेल, एखादी तिथी, एखादा सण, एवढंच काय तर  सुट्ट्यांचं प्लानिंग, पार्टीचं प्लानिंग काहीही असो, नजर थेट भिंतीकडे वळते. प्रत्येक गोष्टीकरता कालनिर्णय हवंच!!
पण माझ्याकरता किवा मी तर म्हणेल सगळ्यांकरताच कालनिर्णयचं “मागचं पान” हेही तितकंच महत्वाचं असतं. मला अजुनही आठवतं घरी कालनिर्णय आल्यावर, त्या कोर्‍या करकरीत गुंडाळीचा रबर काढून त्याला उघडायचं, ते पुन्हा गोलगोल गुंडाळत जाणार, आपण त्याला पुन्हा सरळ करायचं.
मग त्यातल्या प्रत्येक पानावर हात फिरवून आपल्याला हवे ते दिवस बघायचे. लहानपणी सुट्ट्यांचं आकर्षण आणि रंगीत श्रावणाचंही, त्यामुळे नजर तिकडे वळायची. सगळे सण झालेत बघून की मागचं पान. प्रत्येक महिन्याचं मागचं पान हे विशेषच. त्या – त्या महिन्यानुसार त्याच्या मागच्या पानावरचे लेख, व्यंजने, इतर माहिती, राशिभविष्य सगळंच खास..
अगदी लहान असताना चित्र बघायला आवडीची मला, मग जरा मोठी झाल्यावर ज्याच्यात रस असेल ते सगळंच.. विशेषतः रांगोळ्यांची चित्रं. घरात, पप्पांना राशिभविष्यात रस असल्यामुळे आणि त्यांचा त्या विषयी अभ्यास असल्यामुळे, सुरुवाती पासूनच सगळ्यांना ‘राशिभविष्य’ ह्या विषयी विशेष कुतूहल होतं. त्यामुळे कालनिर्णय हाती लागल्या – लागल्या पहिले ते वाचल्या जायचं. 
हळूहळू जशी मोठी होत गेले, वेगवेगळ्या विषयांवर नजर जायला लागली. हे मागचं पान एखाद्या एन्सायक्लोपीडिया पेक्षा कमी नाही. पाकशास्त्र, खगोलशास्त्र, वैद्यकशास्त्र त्यातही सगळ्या पॅथींबद्दलची माहिती, डाएट, योग, फायनान्स ह्या आणि इतर सगळ्या विषयांवरील लेख तिथे आपल्याला सापडतात.
मला आठवतं माझ्या आजीच्या हृदयविकारात सुद्धा ह्या मागच्या पानानी खूप साथ दिली. त्यात तज्ञ मंडळींनी सांगितलेल्या बर्‍याच आरोग्य विषयक उपायांमुळे तिला फायदा झाला. आजोबांचा सुद्धा आवडता छंद होता, कालनिर्णय हातात घेऊन ते मागंच पान वाचत बसायचे.
वयानुसार संदर्भ बदलत जातात तसे माझ्याही बाबतीत झाले. होमिओपॅथिचं शिक्षण सुरू झालं तसे मी वैद्यकीय क्षेत्राची निगडित लेख वाचू लागले. आताही बरेचदा हे लेख वाचत बसायला आवडतं मला.. आणि कदाचित ह्या मुळेच वेदात्मनला ती सवय लागतेय. हे लिहिण्याचं कारणंही तेच… परवा तो कालनिर्णय वरचे अंक वाचत बसला. नुकतीच अंक ओळख होतेय, त्यातही मराठी आणि इंग्रजीत फरक काय ह्याचा अभ्यास कालनिर्णय बघूनच सुरू आहे. मग मी त्याला 2020 चं जुनं कालनिर्णय काढून दिलं. त्यात मागे मी नेहमी काढते ती रांगोळी दिसल्यावर त्याला आनंद झाला, “आई तुझीच रांगोळी”.. आता ते कालनिर्णय त्याच्या पुस्तकांच्या खाणात गेलंय म्हणजे त्याची पारायणं होणारं हे नक्की. मुलं तसही चित्र दृष्टीतून बरंच काही शिकतात. त्यामुळे ते चांगलेच आहे.
आपली संस्कृती आपल्या सवयींसकट मुलांपर्यंत पोहचतेय ह्याचा आनंद सध्या मी अनुभवतेय. संग्रहीत पुस्तकांसारखंच हे कालनिर्णयचं मागचं पान सुद्धा जपून ठेवण्याचं एक कारण मला नव्यानेच प्राप्त झालंय…
आता एक वर्तुळ पूर्ण होऊन नव्याची सुरवात होतेय.. आणि हे आठवणीतलं मागचं पान इथेही सोबत असणार, ह्याची खात्री आहे..
कारण.. कालनिर्णय सबकुछ…

error: Content is protected !!