सामाजिक
कडुलिंबाची गोडी..

कडुलिंबाची गोडी..

लहानपणी गुढीपाडव्याला माझी माई आजी मोठा काळा खलबत्ता घेऊन बसायची. त्यात मिरे, जिरे, खडा हिंग, गूळ, थोडं काळं मिठ, चिंच आणि घरच्याच कडुलिंबाची कोवळी कोवळी; पोपटी रंगाची पानं घेऊन कुटत बसायची. त्याची काळपट गोळी बनवून ती वाटीत तयार ठेवायची. गुढी उभारून झाली की पहिला प्रसाद ह्या गोळीचा!! सुरवातीला वाटायचं, “छी.. समोर पेढा, शेवयाची खीर असताना ही गोळी का??” पण मग हळुहळू ती गोळी तोंडात विरघळायला लागल्यावर त्यातील प्रत्येक पदार्थाची चव जिभेवर उतरायला लागायची.. गुळाचा गोडवा, जिऱ्याची एक विशिष्ट उग्र चव, चिंचेचा आंबटपणा, मिऱ्याची तिखट चव, हिंगाचा एक जरासा ठसका, कोवळ्या रसाळ पानांचा कडवटपणा हे सगळे मिळून जिभ जिंवत करण्याचं आपलं काम चोख पार पाडायचे.  मग दिवस मात्र गोडाचं राज्य असायचं जिभेवर. पण त्या गोळीतल्या सगळ्या जिन्नसाचं राज्य मात्र आजही आहे, जिभेवर आणि मनावरही.
आपल्या संस्कृतीत अश्या अनेक पदार्थांना मानाचं स्थान आहे आणि मागे एक महत्त्वाचा विचार असतो, तो आरोग्याचा. आपल्या कडे प्रत्येक ऋतूत, प्रत्येक सणात बनवल्या जाणाऱ्या पदार्थांमधून आपल्याला निरोगी शरीराचं वरदानच प्राप्त होत असतं. आता ह्या गोळीचंच बघा ना, ह्यातील प्रत्येक साहित्याला आयुर्वेदात महत्त्व आहे आणि हे सगळेच पदार्थ आपल्या रोजच्या आहारातही असतातच. अगदी कडुलिंब सुद्धा! दातून म्हणून वापरण्यात येणाऱ्या कडुलिंबाच्या काडीतून रस पोटात जातोच की!!
तसंच इतरही सणांना आपण जे जे पदार्थ बनवतो, ते सुध्दा त्या त्या ऋतू नुसार शरीर निरोगी ठेवण्याकरता उपयुक्तच ठरतात. जसं, आज गुढीपाडव्याला, काही ठिकाणी श्रीखंड तर काही ठिकाणी शेवयांची खीर करतात. येणाऱ्या उन्हाळ्याकरता श्रीखंड शितलता प्रदान करतं तर ह्याच काळात नव्या गव्हापासून काढलेल्या अतिशय पोषक रव्याच्या शेवया केल्या जातात, म्हणून खीर.
आपल्या पारंपरिक पदार्थांमुळेच आपले पूर्वज प्रत्येक ऋतूत अगदी ठणठणीत असायचे.  आता जसं वातावरण बदलतंय तश्याच आपल्या गरजाही. पण ह्या पारंपरिक पदार्थांची जागा मात्र कायम आहे. त्यामुळेच आजही आपण आपल्या संस्कृतीशी घट्ट जोडल्या गेलोय.. ती गोडी कायम अशीच राहू देत. सर्वांना गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा!

error: Content is protected !!