सामाजिक
ए शादी तेरे नाम के चर्चे बहुत है!

ए शादी तेरे नाम के चर्चे बहुत है!

तसं पहायला गेलं तर लग्न म्हणजे दो दिलो का मिलन, दोन कुटूंबांच एक होणं, मुला मुलीच्या आयुष्यातला महत्त्वाचा दिवस वगैरे वगैरे वगैरे.. पण लग्नाच्या ह्या सोहळ्यात खरंच नवरा – नवरी महत्वाचे असतात का??
तर नाही…. लग्नाच्या दिवशी मैं इस कहानी का हीरो किंवा मैं इस कहानी की हीरोइन हे फक्त नवरा – नवरीलाच वाटायला हवं.. हो ना! पण नाही… लग्नात आलेल्या प्रत्येक पाहुण्याला असं वाटत असतं. लग्न सोहळ्यात आलेला प्रत्येक पाहुणा, मग तो वधू पक्षातील असो वा वर पक्षातील, त्याचा हाच रोल असतो.. अर्थात सगळेच काही तसे नसतात, पण काही विशिष्ट प्रकारातील लोकं असतात असे…
म्हणजे जावाई, आत्याच्या कडचे पावने, एखादे मामाजी किंवा मग शेजार पाजारचे, एखादी आजी, एखादी मामे – आत्ये सासू…. ह्यांच एक महत्वाचं काम असतं लग्नात.. रुसणे…
मला आठवतं आम्ही एका लग्नाला गेलो होतो, पण मुहूर्त निघून गेला तरी लग्न लागेना; मग कानावर एक वाक्य पडलं ‘नवरदेव रुसला’. हे प्रकरण माझ्या करता नविन होतं!तर हा नवर ‘देव’ मारुतीरायाच्या भेटीला गेला ते तीन तास मंदिरातच बसून होता. इकडे लोकं आपली जेवणं उरकून, गिफ्ट कुणाकडे तरी सोपवून निघू लागले! सगळेच वैतागले होते! (अर्थात आम्हीही तेच करणार होतो, शेवटी आमच्या साठी उस दिन का हीरो हमारा पेट था)  आणि लोकं जेवणावर असे तुटून पडले की, वाट बघायला लागली त्याचा सगळा राग आता ह्या जेवणावरच ते काढणार की काय अशी भिती वाटू लागली आणि ह्या त्यांच्या युद्धात जेवण धारातीर्थी पडलं तर… आम्ही उपाशीच.. शेवटी झालं तेच.. आम्ही मिळेल ते पोटात ढकलून निघालो.. पण त्या रुसलेल्या नवर (सो काॅल्ड) देवाचं झालं काय, हा प्रश्न होताच..  तर तो अडून बसला कारण त्याच्या मामाला सफारी सूटचा दिलेलं कापडं आवडलं नव्हतं आणि पोरीच्या वडिलांनी जो पर्यंत त्यांना त्यांच्या पसंतीचा सुट पीस नाही घेऊन दिला, तो पर्यंत ते आणि त्यांच्या मुळे हा भाचा आणि मग सगळीच पुरूष मंडळी मंदिरात… मला तर वाटतं, हनुमानजीही वैतागले असतील… मामाला आवडता सुट पीस अन् त्यांचं ‘योग्य’ ते मानपान मिळालं आणि तब्बल चार तास उशिरा का होईना लग्न लागलं. पण तोपर्यंत त्या मुलीच्या मनःस्थितीचा विचार केला का कुणी? किंवा तिच्या आई – वडिलांचा? ह्या अश्या रितीने बांधलेलं नातं कसं पुढे जाणार ह्याचा विचार कुणी केला का? लग्नात एवढा खर्च करूनही त्या हजार रुपयाच्या सुटाकरता लग्न लांबलं!
आणखी एक, एका लग्नात मुलाच्या भावाने त्याच्या आवडती बासुंदी संपली म्हणून गोंधळ घातला होता, त्यात बिचार्‍या कॅटरिंग वाल्याचं डोकं फुटलं होतं. एका लग्नात मुलीला अंगावर दागिने कमी घातले म्हणून एका आजीनी फार बडबड केली होती.
असे अनेक किस्से होतात, ज्यात कुणीतरी एक जण आपल्या मान सन्मानाकरता सगळ्यांना वेठीस धरतो,
भर लग्नात गोंधळ घालतो आणि मग तो लग्नातला ‘यादगार पल’ होऊन जातो.
पण खरं महत्व ज्यांना मिळायला हवं, ते वर आणि वधू त्यांच्या मनात काय सुरू असेल, ते नविन आयुष्याची सुरवात करणार आहेत, किती संमिश्र भावना असतील.. त्या मुलीला काय वाटतं असेल, आजचा दिवस तिचा, घरच्यांसोबतचा शेवटचा दिवस आहे, उद्या तिची एक नविन ओळख असणार , नवं नाव असणार, त्याबद्दल ती किती अस्वस्थ असेल किंवा नविन घरी गेल्यावर सगळं कसं होणार ह्या विचारात असेल; हे सगळ बाजूला सारून हे फुगे मात्र हवेत असतात..
कुणाला जेवण आवडत नाही, कुणाला अहेर, कुणाला सजावट, कुणाला दागिने तर कुणाला मुलगी किंवा मुलगाच आवडत नाही… आणि मग हे लोकं भर लग्नात आपलं तोंड उघडून सगळ्यांची तोंडं कडू करतात..
आणि ते लग्न, ज्यांच्यासाठी एक अविस्मरणीय दिवस असायला हवा, ते लग्नाच्या प्रत्येक वाढदिवसाला ह्या वाईट गोष्टी आठवून भांडतात.. आणि मग तोच, त्या दिवशीचा नवर’देव’ जो मुग गिळून गप्प बसला होता, तो दहा वर्षांनंतर मुगाची खिचडी खाऊन, त्याचे भांडे घासतांना आपल्याला दिसतो…(I know, फारच वाईट होता हा)…
तर … शादी में कुछ भी करो, कितना भी करो… कुणी ना कुणी तर रुसणाच, फुगणारच…आपण आपला दिवस खराब नाही करायचा…. रुसलेल्याला मनवायाचं अन् चांगला भरपूर ठेचा भाजीत कालवून त्याला खायला द्यायचा आणि त्याची दुसर्‍या दिवशीची सकाळ अविस्मरणीय बनवायची….. अश्या रुसणार्यांचा दुसरा काही बंदोबस्त मला तरी सुचत नाही..
पण हे रुसण्याचेच काही किस्से असेही घडतात जे आपल्याला हसवतातही..
… तेंव्हा थोडा गोड थोडा कडू… चलता है! आखिर इन शादीयों का एक अलगही मजा है! आखिर…

ए शादी
तेरे नाम के चर्चे बहुत है
‘तु भली है तु बुरी है
तु आफात है तु मुसीबत है
तु गुनहगारं है, तेरी वज़ह से मारामार है
तेरे सारे रूप ही बेकार है’
यह कह कर भी तुझसे
प्यार करते बहुत है
ए शादी
तेरे नाम के चर्चे बहुत है
सदियों से देखते आए है
तेरे नामसे बंटे पर्चे बहुत है…

मानसी सगदेव

error: Content is protected !!