मराठी कविता
आयुष्याचा शेला विणला
श्वास घेतला हातामध्ये
आला गेला काळ वेचला
एक उसवला एक गुंफला
आयुष्याचा शेला विणला
शेव हजार विस्कटलेले
हा हवा अन् तोही घेतला
रंग निवडला प्रत्येकाचा
एका खाली एक रुजवला
आयुष्याचा शेला विणला
कुंद मनाचा उजाड कप्पा
उघडून दारे उन्हात गेला
खुलवून सारे पुन्हा पिसारे
गर्भरेशमी काठ सजवला
आयुष्याचा शेला विणला
बाकी सार्या उदासवाटा
काळोखातून सोडत गेला
हाती होते फक्त चांदणे
चंद्र घेऊन त्यात जडवला
आयुष्याचा शेला विणला
हात घेऊनी हाता मध्ये
हवा तेवढा पिळही दिधला
घट्ट बांधून रेशमधागे
उब उरीची घेऊन सजला
एक उसवला एक गुंफला
आयुष्याचा शेला विणला ..
मानसी
Dr. Manasi Sagdeo-Mohril
0