आज तुम्हे एक ख़त लिखना है!
पूर्वीच्या काळी…
हो पूर्वीच्याच म्हणेल.. तर पूर्वीच्या काळी पत्र लिहिली जायची. पत्र.. म्हणजे सगळं कळवण्याचं आणि कळण्याचं एकमव माध्यम. आपल्या जिवाभावाच्या व्यक्तिचं पत्र येणं.. अहाहा.. काय भावना असेल ती.. आपण मुकतोय त्या एका भावनेला..
आता तस म्हणायला गेलं तर ह्या भ्रमणध्वनीवर येणारे संदेशही हे अहाहा वगरे वाटण्याकरता पुरेसे असते जर त्यात;
“काय करतेय?’ ‘जे1 झाल का?’
जानू, बेबी, शोना, पिल्लू
‘ह्म्म ‘
‘येताना 2 किलो कांदे, ‘2 किलो बटाटे, आलं, कोथिंबीर, मिरच्या घेउन ये’..
अरे हो दुधही घेऊनच ये..
बरं, लोणीही टाक लिस्ट मधे
आज स्पेशल काहीतरी करेन
“काय स्पेशल??” इती नवरा
काही नाही, सामान आण, मेसेजेस पाहिले नाहित हे कारण नकोय…”;
ह्या सगळ्याचा समावेश नसता….
असो.. तर..पत्राची जादू काही निराळीच…
आपल्या हस्ताक्षरात आपल्याला हवं ते, हव्या त्या शब्दांत, हवं तसं लिहिता येतं.. चुकू देत, चुकलंच तर.. तिथे व्याकरणाची भिती नसते का ऑटोकरेक्टची झंझट.. स्पेलचेक नको का टायपोच्या फोक्या नको…. जस मनातून उतरतंय, तसं लिहीत जाणं, एका फ्लो मधे.. कुठेही न थांबता.. आपल्या जवळच्या व्यक्तीला मागील पत्र पाठवल्यानंतर आत्तापर्यंत काय काय घडलं हे सांगणं… तुझ्याबद्दल केंव्हा केंव्हा काय काय विचार आलेत ते दोन प्रेम करणाऱ्यांनी एकमेकांना सांगणे किंवा नुकतंच लग्न ठरलेल्या जोडप्याने आपल्या मनातलं कुतूहल लिहून पाठवणे!! आता सारखे धाडधाड फोटो पाठवायची तर सोय नव्हतीच पूर्वी, मग अश्याच एखाद्या पत्रातून आपला फोटो पाठवायचा… मग तो फोटो जन्मभर जवळ राहायचा, त्या पत्रा सोबत …
आई – वडील, बहिण भाऊ, मैत्रिणी ह्यांच्या पत्रात, परिवारातील घडामोडी, कोणी पडलं – झडलं, कुणाला बरं नाही, कुणाचे रिझल्ट, कुणाचे प्रमोशनस्, सासू सुनेच्या चहाड्या – चुगल्या, रुसवे फुगवे, गोड बातम्या सारं सारं लिहीलं जायचं..
मग एकाच पत्रात, घरातल्या चार माणसांचे, वेगवेगळ्या अक्षरातले संदेश असायचे. राखी पाठवतांना बहिण आपल्या भावाला तर तिची मुलगी तिच्या भावाला, अश्या दोन राख्या आणि त्याबरोबर दोन वेगवेगळ्या चिठ्ठ्या..
लहान मुलं लिहायलं शिकलं की आई हमखास त्याच्या हातून काही तरी लिहून घेतं. मग आजी – आजोबांकरता तोच मोठा खजिना असायचा..
आणि इथे कुठे डिलीट बटण नसतं ना! शिफ्ट डिलीट केलं की कायमचं गायब.. ते पत्र जरी हाताशी नसेल तरी कुठल्या वेळी कुठल्या पत्रात काय लिहिलंय हे तपशीलवार लक्षात असायचं. ते लक्षात राहायचचं..
बरं लिहीणाराही किती संवेदनशील असावा आणि संयमीही. आपल्या भावना योग्य त्या शब्दांत मांडणं आणि मग समोरच्याच्या उत्तराची वाट पाहणं.. सोपं नसतं हे.. ह्या वाट पाहण्यातली मजा ही काही औरच..
मी आजही माझ्या घरी गेली की घरी असलेल्या सगळ्या पत्रांवरन एकदा तरी हात फिरवते. जुन्या फोटोच्या प्रिंट्स न्याहाळते. माझं हे सगळ्यात आवडतं काम..
हे सगळे संवाद, हो, संवादच ते, कारण वाचताना लिहिणाऱ्या व्यक्तीचा चेहरा येतोच डोळ्यापुढे.. अगदीच जुन्या सिनेमातल्या सारखं नाही.. पण येतो… तर, हे सगळे संवाद खूप खास असतात.. मनाच्या कोपऱ्यात घर करून, आपल्या आयुष्याच्या एका ठराविक काळाचा ताबा घेणारे आणि मग कायम आठवणीत भेटत राहणारे.. त्यामुळे असे संवाद व्हावेत.. आपल्या हाताने, कागदावर, आपल्या जवळच्या व्यक्तीला एकदा तरी पत्र लिहीवंच… रोज बोलणं होत असेल.. तरीही लिहावंच.. एकदा तरी.. कायम त्याच्या स्मरणात राहण्यासाठी…
आपलं मन शब्दांत कसं व्यक्त होतं ते बघण्यासाठी..
एक पत्र तरी लिहावंच..आज तुम्हें एक ख़त लिखना है
छोटासा ही सही पर
दिल में दबे अल्फाज़ो को
कागज़पर उतरते हुए
अभी इसी वक्त देखना है
आज तुम्हें एक ख़त लिखना है