अन्नपूर्णा
राधाबाईंना जाऊन जेमतेम १५ दिवस झाले असतील अन् व्यंकटेशरावांची तब्येत ढासळली. राधाबाई गेल्या पासून त्यांची खाण्यावरची वासनाच उडाली होती. सहाजिकच होतं. त्यांची आई गेल्यापासून त्यांनी मिळेल तसं खाल्लं. अन्नाला नावे ठेऊ नये ह्या आईच्या एका वाक्या खातर त्यांनी 8 वर्ष मिळेल तसं आणि ते खाल्लं. वयाच्या २३ व्या वर्षी राधाबाईंशी त्यांचा विवाह झाला अन् जोश्यांचा घराला अन्नपूर्णा प्रसन्न झाली. १८ वर्षांची राधा जणू पाकशास्राचं चालतं बोलतं पुस्तक. तिच्या येण्यानी जोशी कुटुंबात जणू वात्सल्यचं वावरत होतं. ती आली तेंव्हापासून ते ती गेली त्या दिवसापर्यंत व्यंकटेशरावांनी फक्तच राधाबाईच्या हातचेचं पदार्थ खाल्लेत. अगदी सणासमारंभाच्या दिवशीसुद्धा राधाबाईंना सुटी नसे. बरेचदा त्या वैतागून म्हणत,”माझ मेलीच स्वयंपाकघर सुटणार नाही, मी सुटेल पण ते नाही”. पण खरं तर आता त्यांचही मन तिथेच रमत असे. पण एक खंत त्यांना नेहमीच होती, त्याची ही कला पुढे नेणारी मात्र कुणीही नाही. अभय, त्यांचा एकुलता एक मुलगा, ज्याला आवड होती खरं स्वयंपाकाची, पण मुलांनी स्वयंपाकघरात काम करायचं नाही, ह्या व्यंकटेशरावांच्या हट्टापायी त्याला त्याची आवड जोपासता आली नव्हती. पण राधाबाई त्याची ही आवड जाणून होत्या. आता वयोमानानुसार कारभार सुनेवर जरी सोपवला तरी त्या स्वतः मात्र रोज, निदान एक तरी पदार्थ करायच्याच. अगदी जायच्या दिवशीही सकाळी त्यांनी व्यंकटेशरावांचा आवडता शिरा तयार करुन ठेवला, म्हणाल्या ‘दुपारीसाठी थोडा जास्तच करुन ठेवते.’ ती दुपार मात्र उतरलीच नाही. राधाबाई गेल्या आणि तेव्हापासून व्यंकटेशरावानी काहीही नीट खाल्लं नव्हतं. त्यांना त्यांच्या राधाच्या हातची चव कुठल्याच पदार्थाला येत नव्हती आणि तिच्या नसण्याचं दुःख आणखी खोलवर रुतत होतं. त्याच त्रासापायी आज त्यांची तब्येत खालावली आणी शेवटी त्यांना ॲडमीट करावं लागलं. डॉक्टर म्हणाले काहीतरी खायला हवं त्यांनी; बाकी सगळं त्यावरच अवलंबून आहे. नाहीतर आम्हीही काही करु शकणार नाही. सलाईन वर किती दिवस जगवायचं? हे ऐकताच अभयच्या मनात गलबलून आलं. आई नाही आणि आता बाबा पण…त्या दिवशी तो घरी गेला आणि येताना बाबांच्या आवडीचा सार – भात घेऊन आला. कसाबसा बाबांना एक घास खाऊ घातला. आणि … “ती चव?” व्यंकटेशराव जरा सावध झाले आणि त्यांनी पुन्हा अभयला भाताचे दोन घास मागितले आणि त्यांची खात्रीच पटली, “हो, हिच ती चव, माझ्या राधाच्या हाताची आमटी. पण कसं शक्य आहे?? ती तर… “त्यांनी अभयकडे पाहिलं… ज्या मुलाला “स्वयंपाकघरात पाय जरी ठेवलास तरी याद राख”, अशी ताकीद त्यांनी दिली होती, त्यानेच आज त्यांची राधा, त्यांची अन्नपूर्णा, त्यांना परत मिळवून दिली होती..आणि त्या आमटीची चव अगदी शेवटच्या श्वासापर्यंत त्यांच्या जिभेवर घुटमळत होती…